वर्णमातृकेतिल स्वर सारे जमले सजले तबकामध्ये
विरामचिन्हांचे दवबिंदू शुभ्र सांडले तबकामध्ये
दहा दिव्यांनी उजळुन जाता दहा दिशातिल अनंत वाटा
स्वरात मिसळुन व्यंजनाक्षरे शब्द उमलले तबकामध्ये
नीर सुगंधी अक्षत पुष्पे काव्यशर्करा अंतर दीपक
धूप चंदनी श्रीफल कळसा नीटस भरले तबकामध्ये
केशर हळदी कुंकुम वर्णी तिलक रेखुनी मम भाळावर
बिंबाचे प्रतिबिंब सुदर्शन झुकुन घेतले तबकामध्ये
पंचपरमपद परमेष्ठींचे णमोकार मंत्रात स्थापुनी
आगमचक्षू मुनी दिगंबर उभे ठाकले तबकामध्ये