वर्षताना दुग्धधारा चांदण्यांच्या
चुंबितो ठिणग्यांस वारा चांदण्यांच्या
गोल या पात्रात हसता बिंब माझे
हलवितो गर्दीस तारा चांदण्यांच्या
वेलदोडे केशराच्या चार ओळी
मिसळतो क्षीरात झारा चांदण्यांच्या
बैसुनी कोजागिरीला शिखरजीवर
वेचिते हिमगौर गारा चांदण्यांच्या
ओतता दाणे अनामिक ओंजळीने
घळघळे ताटात पारा चांदण्यांच्या
वाजता पावा हरीचा गोप येती
कापण्या रानात चारा चांदण्यांच्या
तुंबड्या भरतील ऐदी आजसुद्धा
बसवुनी शेतास सारा चांदण्यांच्या
वृत्त – मंजुघोषा , मात्रा २१
लगावली – गा ल गा गा / गा ल गा गा / गा ल गा गा