नाव कुणाचे स्मृती कुणाची स्मृती कुणाची
परिभाषा जणु विस्मृतीची कृती कुणाची
संस्कृत जननी प्राकृतची हे म्हणणाऱ्यांना
फूस सदोदित देणारी संस्कृती कुणाची
उकरून काढावेच लागते अधिकाराने
कारण बोकाळेल पहा विकृती कुणाची
या बोटावरची थुंकी त्या बोटावरती
तर्कविसंगत मिथ्यात्त्वी संस्कृती कुणाची
सुराज्य येण्या वक्तव्ये नाठाळ करूनी
परामर्श घेणारी ती आकृती कुणाची
श्वास मोकळा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा
विकेल कोणा हलवाई इमृती कुणाची
हिंसक व्यंतर क्षमाशील अवतार म्हणवती
जाण सुनेत्रा तीर्थंकर प्रकृती कुणाची
आत्मपरीक्षण कुणी करावे कोणासाठी
प्रकृतीचा विध्वंस करे संस्कृती कुणाची
करत राहता मूढांचा अभ्यास चिकित्सक
फिरत राहिली भवताली संसृती कुणाची