कण्हेरमाळा गळा घालुनी मूर्त गोजिरी खुले
गुलबक्षीसम अंग रंगवुन सांजसमय सळसळे
कृष्णकमळ कातळी उमलता जळी चंद्रमा हले
गुलाब पिवळा करी सईच्या बोटांमध्ये वळे
प्राजक्ताला धरून अधरी झरझर पळती पळे
बकुल फुलांचा सुगंध भरुनी धूप मंदिरी जळे
झेंडूचे बन सुवर्णवर्खी वाऱ्यावरती डुले
चाफा हिरवा सुगंध वाटित पानांतुन हुळहुळे
जास्वंदीची कर्णभूषणे घालुन सजली फुले
डेलीयाच्या रंगोलीवर शेवंतीची दले
निशिगंधाला फुलवायाला स्वच्छ जाहले तळे
कोरांटीवर दवबिंदूंची मौक्तिकमाला झुले
कर्पुरकचरी नाजुक पिवळी शशिकिरणांनी फळे
बोगनव्हिलिया उधळित रंगा जिथे तिथे झळझळे
कर्दळ हळदी इंद्रधनूवर जांभुळलेले टिळे
कुसुंब कोमल राजसवर्णी भूचंपक जांभळे
गौरीचे कर नागखडा जणु नजर नभावर खिळे
कुंद कागडा जुई मोगरा गळ्यात घालुन गळे
रुई केवडा अर्कशर्करा कुपीतुनी घळघळे
तगरचांदणी झाडांभवती गोल गुंफते खळे
निवडुंगाचे फूल देखणे खरे कुणाला कळे
घाणेरीचे पुष्प सुंदरा सांग कुणाला मिळे
रतनअबोली राजकुमारी करी जनांना खुळे
हिमचंपेची बघुन शुभ्रता गगन जाहले निळे
2 responses to “गगन जाहले निळे – GAGAN JAAHALE NILE”
वाह !!! सगळी बागच कवितेत आल्याने कमेँट करायला उपमाच उरली नाही
एक रेअर स्ताईल कविता, किती घेशील दोन करांनी – असे होऊन जाते .