त्रिशंकुची चार टोके, असतिल ज्याच्या पृष्ठावरती, अशा गोलकाच्या मी केंद्री, झुकविन माथा अनंत वेळा!
अविनाशी आत्मियाशी, भांडुन तंटुन थकल्यावरती, शांत मनाने बसेन तुझिया, चरणी नाथा अनंत वेळा!
ढोल तबला सुरपेटी, हीच साधने ग्रामजनांच्या, देइन हाती मैत्री करण्या, सूर ताल अन लय शब्दांशी;
नृत्य संगीत शिकाया, बडवित टिपरी टिपरीवरती, ऐकत राहिन आत आतला, तै तै था था अनंत वेळा!
नामदेव जना सेना, कान्होपात्रा चोखामेळा, भक्तगणांची मांदीयाळी, येता धामी तृप्त मनाने;
आगमचक्षु संतांना, रसाळ धर्मामृत पाजाया, मुक्त ज्ञानिये आणिक तुकये, रचतिल गाथा अनंत वेळा!
मी तर वैदु ज्ञानार्थी, देइन औषध होउन तत्पर, नारकियांना होइल जेव्हां, मी मी तू तू ची विषबाधा;
गझलानंद मिळवाया, स्वर्गासम या भूवर येण्या, कोमल कणखर मात-पित्यांच्या, खाइन लाथा अनंत वेळा!
आगमचक्षु मित्र खरा! कोमल कणखर बुलंद बंद्या, कैक मुमुक्षू जीवांसाठी, स्वतःच घडला पाथ जाहला!
गोधुलिच्या सांजसमयी, प्रपात होउन धबाबणाऱ्या, शुभ्र जलाने न्हाऊ घालिन, त्या मम पाथा अनंत वेळा!
मात्रावृत्त(१३+१६ +१६+१६=६१ मात्रा)
One response to “गझलानंद – GAZALAANAND”
सुमधुर ..सुरभित रचना …
थक्क झालो!