गझलेचे स्थान
मराठी कवितेच्या किंवा काव्याच्या जगतातील गझलेचे स्थान
मराठी गझल ही मराठीच्या काव्यवाटिकेतील एक फुल मानल्यास ती मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे, कारण मराठी काव्य हा मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे.
वाङ्मय सागरात अनेक विविध प्रकार अंतर्भूत असतात, जसेकी इतिहास, चरित्रे, प्रबंध, शास्त्रीय शोधांवरील ग्रंथ, विज्ञान ग्रंथ, भौतिक शास्त्रे, अध्यात्म शास्त्रे, कविता (काव्य), कथा, नाटक वगैरे वगैरे.
कविता किंवा काव्य या वाङ्मय प्रकाराचे परत अभंग ओवी,पोवाडा,भारूड, लावणी, सुनीत, मुक्तछंद, दशपदी, अष्टाक्षरी, विडंबन काव्य, चारोळ्या, रुबाया, मुक्तक, गझल असे विविध प्रकार पडतात,
मराठी गझल हा मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे हे मान्य केल्यानंतर सर्व प्रथम वाङ्मय म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? याचाही विचार करणे गरजेचे आहे.
‘जे मुखाने वदले जाते ते वाङ्मय’ असा वाङ्मयाचा शब्दशः अर्थ होतो. पण या सर्व समावेशक अर्थाने पाहिल्यास वाङ्मयाची काटेकोर व्याख्या करता येणे अवघड आहे पण जरी अशी काटेकोर व्याख्या करता आली नाही तरी त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन अर्थ उलगडून सांगणारी काही विधाने आपण करू शकतो.
वाङ्मय हे एका शब्दाचे किंवा एकापेक्षा जास्त शब्द कसेही एकत्र येऊन बनत नाही. त्यात शब्द सुसंगतपणे एकत्र येऊन काहीएक विचार मांडलेला असतो.
पण एखादे सूत्र किंवा वाक्य की ज्यात अनेक शब्दांना व्यवस्थितपणे मांडून एखादा महत्वाचा विचार मांडलेला असतो; त्या एकट्या किंवा दुकट्या वाक्यालाही वाङ्मय म्हणता येत नाही.
पण जरका आपण अशा सूत्रबद्ध विचारांची अनेक वाक्ये एकत्रितपणे एखाद्या काव्यात किंवा महाकाव्यात त्या विशिष्ट काव्यप्रकाराचा तोल व घाट सांभाळून सुसंगतपणे गुंफली तर जे काही तयार होईल तो वाङ्मयाचाच एक भाग असतो. असा वाङ्मय प्रकार रसिक वाचकांना, श्रोत्यांना काव्यानंद किंवा फक्त आनंदही मिळवून देतो.
श्री हरी नारायण आपटे यांनी आपल्या विदग्ध वाङ्मय या लेखात वाङ्मय या संज्ञेचा अर्थ खालीलप्रमाणे नमूद केला आहे.
” मनुष्याची सद्सद्विवेक बुद्धी जागृत करून त्यास नेहमी सन्मार्गात ठेवण्यास कारण होणारे, त्याच्या विविध मनोवृत्तीचा विकास करून शुद्ध अशा आनंदाचा आस्वाद देणारे, जे काही अशुद्ध दुःखद अपवित्र नैराश्योत्पादी क्षणिक आहे ; त्यापासून दूर राहण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोध करणारे नेहमी उदार, रमणीय अशा विचारांचा व कल्पनांचा त्याच्या मनात उद्भव व संचार करवून सत्याचे ठिकाणी तो सदा लीन होईल असे या जीवित संग्रामात त्यास नेहमी उत्तेजित ठेवून विजयोत्सुक करणारे”- सारांश, त्यास मनुष्यत्वातून काढून दैवत्वाकडे जाण्याबद्दल उत्सुक करून त्या मार्गाला सन्मुख करणारे- असे जे कोणाचेही अंतःस्फूर्तीने शब्दरूप घेऊन, मुखावाटे बाहेर पडलेले किंवा लेखणीने लिहून ठेवलेले विचार उद्गार त्या सर्वांना समुच्चयाने वाङ्मय ही संज्ञा आहे.
निवडक समीक्षा- पृष्ठ क्र . १२
संपादन: म. द. हातकणंगलेकर आणि गो. मा. पवार
काव्य म्हणजे काय?
वाङ्मय कशाला म्हणावे यावरच्या चर्चेनंतर काव्य म्हणजे काय? हे पहाणे इष्ट ठरेल. कविता किंवा काव्य हा वाङ्मय प्रकार म्हणजे उस्फुर्त व उचंबळून आलेल्या भावनांचा सहज सुंदर उत्कट अविष्कार. चिंतनशील मनाच्या हृदयातून प्रकटलेले ते सगुण साकार रूप असते.
सभेत बोलणारा वक्ता जेव्हा उस्फुर्तपणे आपले विचार मांडत असतो तेव्हा ते बोलणे त्या त्या बाह्य परिस्थितीनुसार उमटत असले तरी त्यातही वक्त्याच्या चिंतनशील मनातून प्रकटलेल्या उत्कट भावनांचा अविष्कार असू शकतो.
पण एखाद्या कवीला एकांतात सुचलेली कविता व सभेत बोलणाऱ्या वक्त्याचे उस्फुर्त विचार यात एक मूलभूत फरक असतो. सभेतले श्रोते आपले विचार ऐकत आहेत याची वक्त्याला जशी जाणीव असते तशा प्रकारची जाणीव कवीला असणारच नाही. कारण कवीची कविता जी त्यावेळी फक्त कवीशी आणि कवीशीच बोलत असते. ती एकांतात जन्माला येते. कधी कधी भोवतालच्या माणसांच्या गर्दीची तिथल्या सर्वांच्या उपस्थितीची काडीमात्र जाणीव तिला नसते. त्यांच्याशी तिचे काहीच देणेघेणे नसते. कधी काळी एकांतात घडलेल्या चिंतनाचे कुठल्यातरी निमित्ताने वर आलेले ते काव्यफुल असते.
म्हणूनच रा.भा. पाटणकर यांनी म्हटल्याप्रमाणे ; ‘काव्य हे एकांतातील चिंतनाचे फळ असते तर वक्तृत्व हे माणसाचा जगाशी जो व्यवहार चालतो त्याचे फळ असते.
शेवटी गझल हाही काव्याचाच एक प्रकार असल्याने वरील विधान गझलेलाही तेवढेच लागू पडते.
गझल हा एक तंत्रप्रधान काव्यप्रकार असल्याने त्याचे तंत्र तर सांभाळावे लागतेच. याशिवाय गझल कुठल्याही भाषेतली म्हणजे मराठी हिंदी उर्दू गुजराथी फारसी मधली असली तरी तिच्यात गझलीयत सुद्धा असायलाच हवी.
गझलीयत म्हणजे काय?
आता गझलीयत म्हणजे काय हे पाहण्यासाठी काही ग्रंथातील संदर्भ पाहणे गरजेचे आहे.
“पारधी जंगलात हरणाचा पाठलाग करीत असताना जिवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळणाऱ्या हरणाची शिंगे झाडात अडकतात. एवढ्यात पारधी त्याच्याजवळ येऊन पोहोचतो. आता आपण मरणार या भीतीने हरिण आक्रोश करू लागते. हे त्याचे असहाय्य्य उद्गार म्हणजेच गझल ! ”
हरिण व गझल यांच्यातला रुपसंबंध दाखवणारी वरील कल्पना ‘सिराजुल लुगात ‘ या फार्सी शब्दकोशात सापडते.
प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी ‘हरिण ‘ या शब्दातच हालचालीतील लालित्य आणि मूर्तिमंत नाजुक सौन्दर्य ही कल्पना अभिप्रेत असल्याने कदाचित ह्या अत्यंत नाजुक भावनांचा अविष्कार करणाऱ्या काव्यप्रकाराला गज़ल हे नाव दिले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.” असे म्हटले आहे.(गज़ल पृष्ठ क्र . १८)
वरील सर्व संबंध पाहिल्यास गझलेतून व्यक्त होणारा भावानुभव हा विमुक्त रसरशीत आणि जिवंत असतो. त्यात वाहत्या पाण्यासारखं लालित्य असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या मनातील नाजुक शल्ये आणि मुग्ध कळ्यांना फुलविण्याचं सामर्थ्यही असतं.
म्हणूनच हरणाचं सौन्दर्य, देखणेपण, त्याच्या हालचालीतील चापल्य, मोहकता, लालित्य, त्याच्या टपोऱ्या काळ्या डोळ्यातील क्षणोक्षणी बदलणारे भाव; जसे कधी उत्सुक, कधी बावरलेले, कधी अधीर तर कधी कमालीचे धीट आणि कधी कमालीचे शांत ! हे सारं गझलेत असतं . म्हणूनच हे नाजुक प्रेम, विरह, वेदना, मुग्ध मौन हे सारं सारं गझलेत जसं न तसं उतरलं तर त्यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.
रदीफ आणि काफिया या वेगळ्या वैशिष्टयांनी सजलेली ‘गझल’ हा एक वृत्तबद्ध काव्यप्रकार आहे. त्यामुळे साहजिकच त्याला एक आंतरिक उपजत गेयता = गझल सहजपणे संगीतबद्ध ही करता येते. विशेष म्हणजे हरिणालाही संगीत अतिशय प्रिय असते.
एरवी एखाद्या वाळलेल्या पानाच्या आवाजानेही बावरून पळणारे हरिण विशुद्ध आणि मधुर संगीताच्या प्रभावाने जागच्या जागी खिळून उभे राहिल्याची उदाहरणे लोककथांमधूनही आढळतात.
यावरून असा सहजच निष्कर्ष काढता येईलकी, गझलेतून व्यक्त होणारी नाजुक भावना किंवा भावनेची हृदयाला भिडणारी उत्कटता जास्त महत्वाची असते.
उत्कट भावना मग ती मरणाच्या भीतीची असो, शत्रू सैन्याशी लढताना हृदयात उचंबळणाऱ्या वीरश्रीची असो,प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाने मनात उठलेल्या दरवळाची असो, मीलनाच्या रात्री अनुभवलेल्या प्रणयातुर धुंदीची असो किंवा विरह वेदनेने व्याकुळ झालेल्या चक्रवाकीच्या दर्दभऱ्या स्वरातली असो, ही उत्कटता म्हणजेच गझलेतून व्यक्त होणारी ‘गझलीयत’ असे म्हणायला काहीच हरकत नाही.
गझलेतला रदीफ काफिया अलामत वृत्त मांडणी कशी असावी याबद्दल कविवर्य सुरेश भट यांनी अगदी थोडक्यात गझलेच्या बाराखडीत सांगितले आहेच आणि तोच गझलेचा कवितीक परिवेष असावा याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
कविवर्य सुरेश भट यांनी वेगवेगळ्या अक्षरगण वृत्तातूनच गझला लिहिल्या. क्वचितच काही मात्रावृत्ताचाही गझल लिहिण्यासाठी वापर ते करतात. गझलेचे श्रेष्ठत्व ती अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात आहे यावर ठरत नसते.
कविवर्य इलाही जमादार यांनी उर्दूतील बहुतेक सर्व मात्रावृत्ते मराठीत आणून गझलेचा श्वास मोकळा करण्यास मदत केली आहे. पण शेवटी गझल मात्रावृत्तातली असो की अक्षरगण वृत्तातली असो पण तिच्यात गझलीयत सुद्धा असायलाच हवी. गझलीयत म्हणजे कवीमनाचा सहजोद्गार असावा.
गझल हा शब्द माधवराव पटवर्धनांनी गज्जल असा लिहिला व तो त्यांनी पुल्लिंगी शब्द म्हणून रूढ केला. कविवर्य सुरेश भटांनी तो स्त्रीलिंगी रूपात ‘गझल’ असा रूढ १९८० पासून स्वयंभूपणे गझल लिहिणारे कवी इलाही जमादार यांनीही तो स्त्रीलिंगीच पण ‘ग़ज़ल’ असा लिहिणे पसंत केले.
पण खरे पाहता ग़ज़ल गज़ल गझल किंवा गजल या त्यांच्या नावावर किंवा लिंगभेदावर आपण जाऊ नये. सध्याची ‘गझल’ सध्याच्या काळात थोडी अस्वस्थ मूड बदलणारी वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे तिच्यातून वेगवेगळे विषय वेगवेगळ्या भावना संवेदना आताच्या काळाप्रमाणे व्यक्त होत आहेत आणि ते तसेच व्यक्त होणे अपेक्षितच आहे आणि गरजेचे सुद्धा आहे.
गझलेचा देह, तिची नाजुकता, तिची कणखर पण मृदू प्रवृत्ती, तिचा परिवेष पाहिल्यास तिचं स्त्रीलिंगी रूपच मनाला जास्त भावतं . एकंदरीत गझलेची वृत्ती पाहता सध्याच्या काळात सर्वानुमते तिचे स्त्रीलिंगी रूप सर्वच गझलकारांनी समीक्षकांनी आणि रसिकांनीही मान्य केलेलं आहे.
गझल म्हणजेच सखी; आणि सखी म्हणजेच व्यक्तीचं किंवा सृष्टीचं सृजनशील संवादी प्रतिरूप, प्रतिबिंब नव्हे.
यात कधी कधी हे प्रतिरूप म्हणजे प्रतिबिंब असल्याचा भास होतो. कारण प्रतिबिंबाप्रमाणे त्याचं बाह्यरूप हुबेहूब तेच असल्याचा भ्रम निर्माण होतो. पण अशावेळी फक्त तिच्या रूपावर न जाता तिचं आत्मस्वरूप पाहिल्यास तिचं वेगळेपण निश्चित लक्षात येतं. यासाठी कवींप्रमाणेच आस्वादकांनाही अस्सल काव्यदृष्टी असायला हवी.
मतला मक्ता रदीफ काफिया अलामत वृत्त छंद यांचा डौल सांभाळत उभ्या राहणाऱ्या गझलेचं बाह्यरूप जेवढं मोहक तितकंच तिचं अंतरंगही नितळ असतं. तिला जसा स्वतःचा देह असतो तसाच तिला स्वतःचा आत्माही असतो. ती मूर्ती नसते तर कलाकाराने घडवलेलं स्वतंत्र शिल्प असतं. गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र काव्य असतं.
तिच्या प्रत्येक शेरातून तिचं कधी वेगळं रूप पाहायला मिळतं, कधी वेगळा रंग पाहायला मिळतो पण त्याबरोबरच वेगळा गंधही जाणवतो.
कधी कधी गझलेतले सर्वच शेर सारख्या रूपाचे किंवा एकाच रंगाचे असतील पण त्यांचा गंध मात्र वेगळा जाणवायला हवा. हे विशिष्ट वेगळेपणच गझलेचं वैशिष्ट्य आहे.
मानवी मन चंचल असतं. क्षणात धरतीवर तर क्षणात आभाळात जातं. एकाच व्यक्तीत आपल्याला वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन वेगवेगळ्या वेळी होतंच असतं.अगदी आपल्या स्वतःतल्याच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती क्षणाक्षणाला बदलणारे आपल्या मनातील भाव आपण स्वतःही अनुभवलेलेच असतात. या सर्व वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन एकाच गझलेत आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळेच गझल ही एक वृत्ती आहे , हे सुरेश भटांचं विधान सार्थ ठरतं.
गझलेतल्या प्रत्येक शेरात एक जिवंत काव्य असतं. त्याचं अंतरंग आणि बहिरंगही कधी वास्तव जीवनाशी नातं सांगणारं असतं. कधी ते शांत सोशिक असतं. कधी कडाडणारं तर कधी झुळकेसारखं शीतलही असतं.कधी सहज उलगडणारं कोड ही असतं. पण असं वेगवेगळं असलं तरीही ते काव्यच असतं. म्हणूनच अशा रूपात असं अंतरंग घेऊन आलेली कोणतीही गझल असुदे ती गझलच असते. गझल सदृश्य नसते.
बऱ्याचदा गझल हा एक आत्मनिष्ठ काव्यप्रकार आहे असं ऐकण्यात बोलण्यात किंवा वाचण्यात येत असतं. अशावेळी आत्मनिष्ठ म्हणजे नेमके काय? आत्मनिष्ठ या शब्दाची काटेकोर व्याख्या असते काय? हे ठरविणे आवश्यक ठरते.
आत्मनिष्ठ म्हणजे फक्त स्वतःच्याच किंवा स्वतः अनुभवलेल्या भावनाच व्यक्त करायच्या काय? यात स्वतःच्या म्हणजे स्त्रीने केवळ स्त्रीमनाच्या किंवा पुरुषाने केवळ पुरुषी वृत्ती दाखवणाऱ्या भावना व्यक्त करायच्या काय? यातही पुढे जाऊन असे म्हणता येईलकी, एखाद्या तरुणीने केलेला एखाद्या वृद्ध स्त्रीच्या मनातील भावभावनांचा अविष्कार किंवा एखाद्या प्रौढ पुरुषाने केलेला किशोरवयीन मुलीच्या मनातील मुग्ध प्रेमभावनेचा अविष्कार आत्मनिष्ठ की वस्तुनिष्ठ/? मग बालकवींच्या फुलराणी या कवितेचं स्वरुप कवी ‘बी’ यांच्या चाफा या कवितेचं स्वरुप, आत्मनिष्ठ की वस्तुनिष्ठ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रथम आपल्याला गझल हा एक तंत्रप्रधान काव्यप्रकार असला तरी तो कारागिरीचा प्रकार नसून कलेचाच एक प्रकार आहे हे मान्य करायला हवे. म्हणूनच गझल हा काव्यप्रकार वस्तुनिष्ठ कि आत्मनिष्ठ हा वाद आपल्याला कला आत्मनिष्ठ की वस्तुनिष्ठ या वादापर्यंत आणून सोडतो.
या संदर्भात श्री. दि. के. बेडेकर आपल्या ‘साहित्य निर्मिती व समीक्षा’ या ग्रंथात म्हणतात , कलेला वस्तुनिष्ठ ठरवणारे टीकाकार कलावंताला केवळ आरसा किंवा मेणाची तबकडी समजतात व कलानिर्मितीमध्ये सृजनाची प्रेरणा केवळ गतिमान वास्तवाकडून मिळते असे मानून कवीच्या व्यक्तित्वाला संक्षेप देतात. याच्या उलट आत्मनिष्ठ कलेचे पुरस्कर्ते वास्तवाला निव्वळ जड किंवा स्थिर मानतात.व कलात्मक सृजनाचा एकमेव उगम कलावंताच्या गतिमान सर्जनशील व्यक्तिमत्वात आहे असे मानतात. दोन टोकाची ही दोन मते एकांगीपणामुळे सदोष आहेत. तसेच या एकांगी मतांची नुसती गोळाबेरीज करण्यानेही भागत नाही. उलट पक्षी कला निर्मितीत व्यक्तित्व व वास्तव यांचे द्वंद्व असते असे मानले पाहिजे. (साहित्य निर्मिती समीक्षा पृष्ठ क्र. २०-२१)
भारतीय संस्कृतीत परंपरेत वाढलेली माणसे मग ती कलाकार असोत, आस्वादक असोत किंवा साधी सुधी माणसे असोत ; ती जमिनीला नदीला माता मानतात. आकाशाला पर्वताला पिता मानतात.
वाऱ्याशी झाडांशी फुलांशी अगदी चंद्र सूर्य तारका यांच्याशीही हितगुज करतात. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते शंभरीतल्या आजोबांच्या भाव-भावनांशीही समरस होतात.
आपण आपल्या आत्म्याला सुद्धा भावी परमात्म्याचेच एक संसारी रूप मानतो. आपले तत्वज्ञान आपली शास्त्रे यांचे आपल्यावर संस्कार असतात.
पण जरी हे असे असले तरीही निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घेताना किंवा अन्य अनुभव घेत असताना आपण आपले जीवन आपला स्वभाव आपले अस्तित्व विसरत नाही.
सृष्टीतील सर्व जीवांकडे पाहताना तेही आपल्यासारखेच या सृष्टीचा एक अंश आहेत असे आपण समजतो. त्यांच्याशी अशी एकत्वाची भावना असल्यामुळेच आपण त्यांच्या अंतरंगाशी एकरूप होतो.
हा आपल्या मनोवृत्तीतला गुण असेल किंवा दोष असेल पण तो आपल्या इतर काव्यप्रकाराप्रमाणेच आपल्या गझलेतही उतरणे स्वाभाविकच नाही काय? कारण शेवटी गझल हा काव्यप्रकार आपल्या स्वत्वाला जपणारा आणि त्याचबरोबर इतरांच्याही स्वत्वाला जपणारा एक आत्मनिष्ठ काव्यप्रकार आहे.
कुठलीही कलाकृती असुदे तिला स्वतःचा जसा देह असतो तसाच आत्माही असतो. कलावंताच्या मनातील अतृप्ती अस्वस्थता सतत पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी धडपडत असते.
कलावंताच्या मनातील भावभावना बाह्यजगातील एखादे सुंदर निसर्गदृष्य,एखादी व्यक्ती एखादी घटना पाहून उद्दीपित होतात. त्या दृश्याला पाहून ऐकून अनुभवून आत्मसात करून, त्यातल्या पूर्णत्वाच्या जास्तितम जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. असा प्रयत्न करत असताना जी काही कलाकृती किंवा काव्य(शब्दकृती) तयार होते ती म्हणजे कलाकृतीचा देह असतो. पण देहाबरोबरच कलाकृतीला स्वतःचा स्वतंत्र आत्माही प्राप्त झालेला असतो.
अशी आत्मस्वरूप प्राप्त झालेली कलाकृती किंवा काव्य म्हणजे कवीच्या संवेदना व बाह्यजगाकडून मिळालेल्या संवेदना यांचे संयुग असते. म्हणूनच कलाकृतीचा आत्मा कलाकाराच्या आत्म्याहून वेगळा असतो. हा आत्मा जितका विशुद्ध असेल तेवढे त्या कलाकृतीचे आंतरिक सौंदर्य जास्त असते.
म्हणूनच कलाकृतीचे आंतरिक व बाह्य सौन्दर्य हे जितके कलाकारच्यम आंतरिक सौन्दर्यावर अवलंबून असते तितकेच ते त्या कलाकृतीसाठी निमित्त बनलेल्या व्यक्तीच्या , सृष्टीच्या आंतरिक सौंदर्यावर अवलंबून असते.
गझल ही सुद्धा एक कलाकृतीच असते व या गझलेतील प्रत्येक शेर सुद्धा एक स्वतंत्र कलाकृतीच असतो. म्हणूनच गझलेतल्या प्रत्येक शेराला स्वतःचा देह असतो व आत्माही असतो.
मुसलसल व गैर मुसलसल गझल
मराठी गझलेतही उर्दू गझलेप्रमाणेच मुसलसल व गैर मुसलसल गझल असे दोन प्रमुख प्रकार पडतात.
मुसलसल गझलेत एकच विषय किंवा एकच कल्पना घेऊन त्यावर त्यावर रचलेले वेगवेगळे शेर असतात. या गझलेतील मागच्या पुढच्या शेरांचा एकमेकांशी किंवा इतर शेरांशी संदर्भ असला तरी प्रत्येक शेर जरी वेगळा काढला तरी सुद्धा त्याचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येतो. उदा. एखाद्या मुसलसल गझलेत आई या एकाच विषयावर सर्व शेर असू शकतात. एखाद्या गझलेत प्रेयसीवरील प्रेम या मध्यवर्ती कल्पनेभोवती रचलेले सर्व शेर असू शकतात. पण तरीही गझलेतील प्रत्येक शेर वेगळा काढला तरी त्यांचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येतो किंवा कधी शेरांचा मागचा पुढचा क्रम कसाही मागेपुढे केलातरी चालू शकते.
एकंदरीत मुसलसल गझल म्हणजे एकच विषय एकच कल्पना एकच भाव असलेल्या अनेक कवितांचे मिश्रण असते. पण हे मिश्रण लिंबू सरबताप्रमाणे आंबट गोड असू शकते किंवा बासुंदीप्रमाणे मधुर सुवासिकही असू शकते.
गैर मुसलसल गझलेत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या कल्पना किंवा वेगवेगळी भावस्थिती असणाऱ्या अनेक शेरांची गुंफण असते. अशा शेरांची उत्कृष्ट सरमिसळ असणारी गझल हे सुद्धा एक मिश्रणच असते. पण हे मिश्रण दूध साखरेच्या मिश्रणाप्रमाणे नसून खास फोडणी जमलेल्या चिवड्याप्रमाणे किंवा चटकदार भेळेप्रमाणे असते.
रिवायती आणि जदीद गझल
फार्सी व उर्दू भाषांमधील गझला पाहिल्यास प्रेम हा त्या गझलांचा स्थयीभाव आहे. यामध्ये गझल या शब्दाचा वाच्यार्थच प्रेयसीस उद्देशून काढलेले उद्गार किंवा प्रणयगीत असा आहे. ज्या गझलांमध्ये प्रेम शृंगार विरह असे पारंपरिक विषय हाताळले जातात त्यास रिवायती गझल असे म्हणतात.
अलीकडच्या गझलांमध्ये अनेक नवीन कल्पना विषय जसे राजकारण समाजकारण स्त्रीमुक्ती विज्ञान अध्यात्म यावरील शेरही असतात. अशा गझलांना जदीद गझल म्हणतात.
गझलेत कमीत कमी पाच शेर असणे गरजेचे असते. गझलेतल्या पहिल्या शेराला मतला म्हणतात. मतल्यामध्ये गझलेचे वृत्त काफिया रदीफ यांची स्पष्ट कल्पना येते. त्यामुळे मटल्यावरून गझलेची जमीन किंवा आकृतिबंध स्पष्ट होतो.
मतल्याशिवाय गझलेतल्या इतर शेरांमध्येही तेच वृत्त शेवटपर्यंत सांभाळले जाते. पण इतर शेरांमध्ये फक्त शेरातल्या दुसऱ्या ओळीत काफिया व रदीफ येतो. गझलेतला रदीफ शेवटपर्यंत तोच राहतो. पण काफिया वेगवेगळे असतात. काफियाचे शब्द वेगवेगळे असले तरी त्यात मात्रा व अलामत सांभाळणे आवश्यक असते. अलामत म्हणजे स्वरचिन्ह.
गझलेतल्या मतलयामधील दोन्ही ओळीत शेवटी येणारा शब्द किंवा शब्दगट रदीफ म्हणून ओळखला जातो. रदीफ़च्या आधी येणारा शब्द काफिया असतो.
काफियामधील शेवटची न बदलणारी जी अक्षरे असतात त्या अक्षराच्या आधी येणाऱ्या विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो त्याला स्वरचिन्ह किंवा अलामत म्हणतात.
कधी कधी गझलेच्या शेवटच्या शेरात कवीने स्वतःचे नाव गुंफलेले असते. त्या शेरास मक्ता म्हणतात.
काही गझलांमध्ये रदीफ नसतो पण काफिया मात्र असतोच. अशा गझलांना गैरमुर्रदफ गझल असे म्हणतात.
कविवर्य सुरेश भट यांनी गझलेच्या बाराखडीत या सर्वांवर विस्तृत विवेचन केले आहे. ते गझलकारांनी आणि गझलेच्या चाहत्यांनीही अवश्य वाचायला हवे.
कविवर्य सुरेश भट यांनी मराठी काव्यजगतात गझलेला अढळ स्थान मिळवून दिले. त्यांनी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत गझल पोहोचवण्यात यश मिळवले. सुरुवातीला छोट्याश्या ठिणगीच्या रूपात प्रकटलेल्या गझलेच्या प्रकाशात आता सर्वच लख्ख दिसायला लागले आहे.
ही ज्वाला ठेवत ठेवण्यासाठी सुरेश भटांच्या परंपरेतल्या अनेक गझलकारांच्या बरोबरच स्वतंत्रपणे गझल लिहिणाऱ्या अनेक गझलकारांनीही आपले योगदान दिले आहे.
गझल
गझल हा काव्याचा एक प्रकार आहे. काव्य ही एक कलाच आहे. म्हणूनच गझल हा जसा काव्याचा एक प्रकार आहे तसेच तो कलेचाही प्रकार आहे.
गझल या काव्यप्रकारावर अरबी व इराणी या दोन्ही संस्कृतींचा प्रभाव आढळतो.
भारतात गझल हा काव्यप्रकार बाराव्या तेराव्या शतकात सूफी संतांच्या बरोबर आला. मुसलमान राज्यकर्त्यांचा राजाश्रय मिळाल्याने तो लोकप्रियही झाला. सतराव्या शतकात उर्दू भाषेतही हा काव्यप्रकार हाताळला जाऊ लागला. नंतर नंतर उर्दू भाषिकांमध्येच नव्हे तर इतरही भाषिकांमध्ये तो इतका लोकप्रिय झालाकी त्याला उर्दू भाषेची सम्राज्ञी असे म्हटले जाऊ लागले.
अरबी फार्सी उर्दू या तिन्ही भाषांमध्ये गझल हा शब्द स्त्रीलिंगी म्हणूनच उपयोगात आणतात.
मूळ अरबी शब्द घझिल असा आहे. अरबी भाषेत घझिल या शब्दाचा अर्थ प्रेमालाप करणे असा आहे.
घझिल या अरबी धातूपासून घझल म्हणजे प्रेमालाप हे नाम तयार झाले. उर्दू व हिंदी भाषेत ‘घझल’ हा शब्द ‘ग़ज़ल’ असा लिहितात.
मराठी गझल
डॉ. अविनाश वि. कांबळे यांनी ‘मराठी गझल १९२० ते १९८५’ या प्रबंध ग्रंथात असे म्हटले आहे की ;
“अमृतराय (१६९८- १७५३) ह्यांच्या जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे? या पदाच्या रूपाने गझल हा फार्सी उर्दू काव्यप्रकार अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत अवतरला.
या पुस्तकातील(ग्रंथातील) माहितीवरून असे कळतेकी, गज्जलांजली या काव्यसंग्रहाचे जनक रविकिरण मंडळातील कवी माधव ज्यूलीयन यांनी अमृतराय व मोरोपंतांच्या रचना गझल स्वरूप असल्याचे सर्वप्रथम नमूद केले. माधव ज्यूलीयन यांनी गझलेसाठी गज्जल हा पुल्लिंगी शब्द वापरला.
कविवर्य माधव ज्यूलीयन यांचा जन्म गुजराथमधील बडोदा येथे २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. एम.ए. ला असताना त्यांनी इंग्रजीबरोबरच फार्सी हा विषय ही घेतला होता. फार्सीचा अभ्यास करताना त्यातील गझल या काव्यप्रकाराबद्दल त्यांना जिज्ञासा व गोडी उत्पन्न झाली. त्यामुळे त्या काळात काही गुजराथी गझलांचे मराठी अनुवादही त्यांनी केले. गझलांचा अभ्यास आस्वाद घेत असताना मराठी वाचकांनाही गझलेचा परिचय व्हावा त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
गझलांचा अभ्यास करीत असताना त्यांनी गझल लेखनही केले. या सर्व अभ्यासपूर्ण चिंतनातून आणि गझल लेखनातून त्यांना जे काही गवसले ते असे” गझलेत वापरले जाणारे असे रदीफ व काफिया व गझलेच्या प्रत्येक शेराचे स्वयंभू स्वरूप ही गझलेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच गझल ही कवितेपेक्षा वेगळी ठरते. ” पण असे असूनही कविवर्य माधव ज्यूलीयन यांनी गझलेतील ‘ रदीफ’ व एका शेराचा दुसऱ्या शेराशी काहीही संबंध नसणे ही गोष्ट चुकीची असल्याचे नमूद केले. त्यांनी मराठी कवींना रदीफचे बंधन झुगारून देण्याचा सल्ला दिला.
डॉ. अविनाश कांबळे यांनी आपल्या प्रबंध ग्रंथात माधव ज्यूलीयन यांनी कालानुक्रमे केलेल्या गझलेच्या सात व्याख्या दिलेल्या आहेत.( मराठी गझल १९२० ते १९८५, पृष्ठ क्र. ५१)
या सात व्याख्यांवरून डॉ. अविनाश कांबळे असा निष्कर्ष काढतात की, ” माधव ज्यूलीयन गझलेची एकच एक व्याख्या निश्चित करू शकले नाहीत. परंतु; त्यातल्या त्यात श्रुंगार प्रेम या विषयावरील भावगीत ही सर्व लक्षणे ज्या कवितेत असतील तिला ‘ गझल’ म्हणावे असे माधव ज्यूलियन यांना सांगायचे आहे.”
म्हणूनच माधव ज्यूलियन यांनी गझलेबाबत केलेले कार्य महत्वपूर्ण असले तरी त्यांच्या गझला सदोष आहेत व गझलेचे यथायोग्य मूल्यमापन ते करू शकले नाहीत, असा डॉ. कांबळे यांनी काढलेला निष्कर्ष योग्यच आहे.
माधव ज्यूलीयन यांच्या पद्धतीने लिहिलेला ‘ गज्जल’ हा काव्यप्रकार १९४५ ते १९६५ या काळात मागे पडत गेला.
मराठी काव्यक्षेत्रात कविवर्य सुरेश भट यांनी मराठी गझल समर्थपणे हाताळली. १९६३ च्या सुमारास त्यांचे मराठी काव्यक्षेत्रात आगमन झाले. त्यांच्या समर्थ शैलीदार गझल लेखनामुळे ‘गझल हा काव्यप्रकार खऱ्या अर्थाने मराठी मातीतच नव्हे तर तर मराठी काव्यातून मराठी मनातही फुलला. वाढला आणि फोफावलाही .
कविवर्य सुरेश भटांची गझल तंत्रदृष्ट्या फार्सी व उर्दू गझलेइतकीच काटेकोर असूनही ‘ती’ गझल म्हणजे त्या गझलांचं अंधानुकरण नव्हती. तिचा मंत्र खास मराठी माणसांच्या संवेदना व्यक्त करणारा होता.
कविवर्य सुरेश भटांच्या गझलेला समीक्षकांनी तर स्वीकारलेच पण त्यांची गझल अगदी तळागाळातल्या निरक्षर कष्टकरी कामगार वर्गांच्याही काळजात जाऊन बसली. तिच्यातल्या भावना अस्सल मराठमोळ्या होत्या.
रदीफ व काफिया ही गझलेची फक्त वेगळी वैशिष्ट्ये नसून त्याशिवाय ती गझलेची सौंदर्य स्थळेही असतात. पण या वैशिष्ट्यांनाच फाटा दिल्यामुळे किंवा त्यांचे महत्व न ओळखल्याने माधव ज्युलियन यांची गझल मराठी रसिक मनाला फार काळ आकर्षित करणारी किंवा पकडून ठेवणारी ठरली नाही.
कविवर्य सुरेश भट यांच्या तंत्र मंत्र आणि भाव जपणाऱ्या गझलांमुळे मराठी गझलांचा खास चाहता वर्ग ते निर्माण करू शकले. त्यामुळे उर्दू गझलांचा चाहता बनलेला मराठी रसिकांचा वर्ग पुन्हा मराठी गझलेकडे वळला.
कविवर्य सुरेश भटांनी माधव ज्यूलियन यांच्या गझलेतील त्रुटी कच्चेपणा व दोष टाळून गझला लिहिल्या. त्याचबरोबर त्यांनी गझलांचा चिकित्सक अभ्यास केला. गझल लिहिण्यासाठी लागणारे मूलभूत तंत्र व मंत्र कवींना समजावून सांगण्यास प्रारंभ केला.
त्या काळच्या मराठी कवींचा गझल लेखनात होणारा गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी विविध लेख लिहिले. त्या लेखांमधून गझल लेखनासंबंधीचे तंत्र मंत्र शुद्ध व काटेकोर स्वरूपात समजावून सांगण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले.
खऱ्याखुऱ्या मराठी मनाच्या संवेदना, मराठमोळा शृंगार, मराठमोळा बाज सांभाळणारी गझल तंत्रशुद्ध व काटेकोर स्वरूपातच व्यक्त व्हावी व मराठी मनात सहजपणे रुजावी म्हणून त्यांनी ध्यासच घेतला. गझल लेखनाबरोबरच गझल पठणाचे जाहीर कार्यक्रम सुरु केले. मराठी गझलेला स्वतःचा वेगळा बाजच नव्हे तर वेगळा चेहराही मिळवून दिला.
नवोदित गझलकारांना गझल लिहणे सोपे जावे, त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गझलेची बाराखडी लिहिली. त्यामुळेच नवोदित मराठी गझलकारांना व कवींनाही गझलेचा आकृतिबंध, त्यातल्या शेरांचे स्वरूप याबद्दल निश्चित दिशा दाखवून दिली.
गझलेचा आकृतिबंध व त्यातील शेरांचे स्वरूप या संदर्भात ते न्हणतात;
“केवळ आकृतिबंधाने गझल ठरत नसते तर तिच्यातील प्रत्येक शेर हा संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र व सार्वभौम कविता असायला हवी. मागच्या पुढच्या शेराचा संदर्भ माहित नसतानाही प्रत्येक शेराचा स्वतंत्र कविता म्हणून आस्वाद घेता यायला हवा. हेच गझलेचे गमक आहे.
गझलेच्या आकृतिबंधात उलगडत जाणारी सलग कविता लिहिता येऊ शकते, पण तिला गझल म्हणता येईलच असे नसते. गझलेच्या शेरातून जे सांगायचे त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत व दुसऱ्या ओळीत त्याचा प्रभावी समारोप असायला हवा. शेर हा केवळ विरोधाभासावर असतो ही समजूत पार चुकीची आहे. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. कोणताही विषय किंवा भावना शिवीगाळ न करता प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता आला पाहिजे. रचनेत सोपेपणा असावा. शेर वाचकांच्या सरळ हृदयात शिरावा अशी शब्दांची मांडणी असावी.
रदीफ काफिया वृत्त अलामत ही सर्व बंधने पाळूनही गझल सहज सोपी गोटीबंद असावी. गझलेत शेवटचा शेर ज्यात कवीचे नाव गुंफलेले असते त्याला मक्ता म्हणतात. पण अलीकडच्या काळात अशा मक्त्यांची गरज नाहो. कारण सध्या मुद्रणकला अस्तित्वात आहे व अन्य एका उपयुक्त शब्दासाठी लागणारी जागा कवीच्या नावामुळे वाया जाते. ”
अशा प्रकारे विविध ठिकाणी केलेल्या लेखांमधून गझलेबाबतचे आपले विचार कविवर्य सुरेश भट यांनी मांडले आहेत.
गझलेच्या तंत्र मंत्र आणि भाषेबाबतही ते सहजपणे बरेच काही सांगून गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे;
” मराठी गझल ही उर्दू गझलेचे निव्वळ अनुकरण केवळ नक्कल तिचे प्रतिबिंब ठरू नये तर तिला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे. ”
मराठी भाषेच्या मृदूपणाविषयी सांगताना ते म्हणतात, ” मराठी भाषेला नजाकतीची गरजच नाही. ज्यावेळी उर्दूचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी मराठी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यासारखे ग्रंथ लिहिले गेले. आपल्याच मायबोलीचे आम्हाला ठाऊक नसते हे आमचे करंटेपण आहे. गझल हे फक्त श्राव्य काव्य नसून गझलेतले शेर हे फक्त कानावर पडण्यासाठी नसतात. त्यांचे चिंतन होत असते.”
मराठीतील इतर गझलकार
कविवर्य सुरेश भट यांनी मराठी गझलेला साहित्य प्रांतात मानाचे स्थान, प्रतिष्ठा मिळवून दिली.
कविवर्य माधव ज्यूलियन यांनी गझलेसाठी “गज्जल” हा पुल्लिंगी शब्द वापरला. पण सुरेश भटांनी त्यासाठी गझल असे स्त्रीलिंगी रूपच वापरले व रूढ केले. त्यांच्या शिष्य परंपरेतील अनेक गझलकार गझल हाच शब्द वापरतात.
श्री. इलाही जमादार हे १९८० पासून गझल लेखनास प्रारंभ केलेले कवी व गझलकार गझलेसाठी ‘ ग़ज़ल ‘ हे स्त्रीलिंगी रूप वापरतात. गझलेत आवर्जून मक्ता लिहिणारे गझलकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या शिष्य परंपरेतील काहीजण आजही ‘ ग़ज़ल ‘ हे हिंदी उर्दूतील स्त्रीलिंगी रूपच वापरतात.
वाई येथे झालेल्या पाचव्या गझल संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राम पंडित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग़ज़ल लिहावे की गझल याबाबत खालीलप्रमाणे विचार व्यक्त केले आहेत. ते असे;
” गजल हा शब्द ग़ज़ल लिहावा की माधवराव पटवर्धनांप्रमाणे “गज्जल” लिहावा; गझल वाचताना ‘गा ल गा गा’ करावे की ‘ना र ना ना’ करावे हे वाद निरर्थक आहेत. त्यातून अंततः काहीच निष्पन्न होणार नाही. जसे जसे योग्य वाटेल तसे त्याने लिहावे, वाचावे. ग़ज़ल हा शब्द उर्दूची निकटतम भाषा व मराठीची देखील लिपीसाम्य असलेली भाषा हिंदीत जसा लिहितात तसा आम्ही वापरतो. ग आणि ज खाली हिंदी भाषा तज्ञांनी सांगोपांग विचार करून वैशिट्यपूर्ण उर्दू उच्चारण वेगळेपणाने नमूद करण्यासाठी नुक्ते दिले आहेत. तेच आपणही भाषिक दुराभिमान न बाळगता वापरावे ही नम्र सूचना, नाहीतर विनंती आहे. कर्नल ळ चा उच्चार जसा अनेक भाषेत नाही तसेच उर्दूतील काही शब्दोच्चार आपल्या अनेक भाषेत नाहीत हे मेनी करून हिंदीत निर्धारित केलेले हे वर्ण स्वीकारणे फारसे आक्षेपार्ह ठरू नये असे वाटते. ”
(गजल सागर पृष्ठ क्र.)
गझलसम्राट कविवर्य सुरेश भट यांच्या परंपरेतील गझलकार श्री प्रदीप निफाडकर आपल्या ‘गझलदीप’ या गझलसंग्रहात गझल शब्द कसा लिहावा याबाबत आपले मत असे व्यक्त करतात.
” गझल लिहावे की ग़ज़ल यावरून मराठी भाषेत दोन प्रवाह आहेत. ग़ज़लमध्ये ग आणि ज खाली नुक्ता (टिम्ब ) आहे. पद्धत मराठीत नाही. मग पाडायला काय हरकत आहे असे काहींचे म्हणणे आहे; आणि ते सर्वमान्य झाले तर काहीच हरकत नाही. तूर्त ती पद्धत नाही. उदाहरणच द्यायचे तर ;
जरा (थोडेसे) आणि जरा (म्हातारपण) वाचताना आपण नीट वाचतो; टिम्बची कुबडी हवी कशाला ? शिवाय उर्दूत झ अक्षरच नाही. आपल्याकडे आहे तर उपयोग करून घ्यायला हवा. उर्दूत ज चा वेगवेगळा उच्चार दाखवताना ;
जीम , जाल, जे, जोय असे चार शब्द आहेत. आपण जरा जरा आणि झरा हे तिन्ही उच्चार वेगळे आणि उत्तम करतो. पण आपली शक्ती न ओळखून काही करंटे गजल लिहितात. लिहूद्यात, उद्या चांदणी शब्द लिहिताना चुकून किंवा जाणीवपूर्वकच खाली टिम्ब दिले तरी तिची शीतलता तिचे देखणेपण तसेच राहणार. तेव्हा ज्याला जे पटेल ते लिहावे. गझलेच्या सुंदरतेत कमी पडणार नाही. ”
कविवर्य सुरेश भट यांच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील गझलकारांची एक फळीच गझलेच्या क्षेत्रात कार्यरत झाली.
१९८२-८५ नंतर अनेक कवी गझल लेखनाकडे वळले. गझल लेखनाच्या कार्यशाळाही घेतल्या जाऊ लागल्या. मात्रावृत्तांच्या वापरामुळे गझल थोड्या फार प्रमाणात मुक्त झाली. काही जणांनी स्वरांचे यमक मराठीत आणून तिला पंख मिळवून दिले.
गझलकार डी. एन. गांगण यांच्या ‘तोच रस्ता त्याच वाटा’ या गझल संग्रहाच्या प्रस्तावनेत गझलकार श्री. दिलीप पांढरपट्टे यांनी स्वरांच्या यांकाबद्दल आपले मत असे व्यक्त केले आहे;
” मराठी गझलमधल्या यमकाबद्दलच्या एका अत्यंत घातक गैरसमजाबद्दल थोडंसं भाष्य करणं या पुस्तकाच्या निमित्तानं मला आवश्यक वाटतं. उर्दूमध्ये स्वरांचं यमक चालतं. उदाहरणार्थ ‘हुआ आणि माजरा’ ,”
मात्र काही जाणकारांनी ते निषिद्ध मानले आहे. गालिबची प्रख्यात गझल सर्वानाच ठाऊक आहे;
दिले नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही ये माजरा क्या है
या गझलमध्ये ‘आ’ या स्वाराचेच यमक आहे. कोणत्याही व्यंजनाचे नाही. स्वरांचं यमक नको म्हणणाऱ्यांनी या सुंदर गझलचं किमान हजार वेळा पारायण करावं आणि याच्या एक सहस्त्रांश गुणवत्तेची गझल लिहिता आली तर लिहावी असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. मराठी गझलने अजूनपर्यंत फार मोठी झेप घेतलेली नाही याचं एक महत्वाचं कारण म्हणजे स्वरांचं यमक न वापरणं हे आहे. स्वरांचं यमक वापरण्याने गझलमध्ये काहीच वैगुण्य निर्माण होत नाही. उलट शब्दांचं मोठं भांडार खुलं होतं. मात्र वारा -पारा-तारा, सोटा-लोटा-खोटा अशी व्यंजनांचीच यमके घेतल्याने कवितेच्या आकाशातले सगळे तारे शब्दांच्या एवढ्याश्या लोट्यात बंदिस्त करावे लागतात. मराठी गझलचा पतंग उंच जात नाही कारण त्याला असलेला यमकांचा मांजा भलताच आखूड आहे.”
(प्रस्तावना-तोच रस्ता त्याच वाटा, डी. एन. गांगण )
‘तोच रस्ता त्याच वाटा’ या गझलसंग्रहाच्या शेवटी श्री.डी.एन. गांगण यांनी गझल लिहू इच्छिणाऱ्या कवी आणि कवयित्रींसाठी सोळा पानांचा अभ्यासपूर्ण लेख अत्यंत सरल व सोप्या भाषेत लिहून गझलचे तंत्र कवींना घरबसल्या आपल्या हातात आणून दिले आहे. तो लेख जुन्या व नव्या गझलकारांनी वाचायलाच हवा.
या लेखात मात्रा कशा मोजाव्यात? स्वराघात म्हणजे काय? वेगवेगळे छंद, लघुगुरू मात्रांच्या क्रमाने कसे निश्चित केले जातात? दोन लघु शब्दांची जेथे गरज असते त्या ठिकाणी एक गुरू अक्षर घेऊन छंदपूर्ती का करता येत नाही? वगैरे प्रश्नांची उकल सोप्या पद्धतीने केली आहे.
१९८५ नंतरही अनेक कवी आणि गझलकारांनी गझला लिहून गझल चळवळीसाठी योगदान दिले आहे.
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांची आस्वादात्मक समीक्षा- पृष्ठ क्र.७ ते २१ वरून साभार…
क्रमश: