हृदय गर्भात रत्नत्रय झळझळाया भरुन कर कलशास करकमली
वसे शासन जिनांचे पूर्ण ब्रह्मांडी खिरे वाणी त्रिदल कमली
नको रोखूस श्वासाला नको चुकवूस नजरेला भिडव नेत्री
भिजाया चिंब प्रतिबिंबी नयांच्या दोन धारांनी नयन कमली
निळ्या नक्षत्र वाटांनी बरसता माळ हस्ताची नऊ रात्री
झरे संगीत लहरींचे रसा माळेत ज्वालांच्या सलिल कमली
ऋतूंचे सोहळे साही टिपाया नयन आतुरले जलद झरले
वसंती ग्रीष्म वर्षा शरद हेमंती लुटे सोने शिशिर कमली
मनगटावर करांच्या रंगमंची तूच कर नाटक भरे घटिका
गुमट वा घुमट त्याच्या तीन काट्यांसह गरगराया समय कमली
रवी अन सोम ग्रह तारे शनी मंगळ गुरू गगनी फिरे कक्षी
बुधा दे हात शुक्राला खराटा धूमकेतूचा घुमव कमली
न एकाकी न दुर्दैवी खरा क्षत्रिय सुनेत्रा पुत्र गुंडा हा
हिरा झळके स्वतेजाने सुखांना लोळवायाला चरणकमली