अलीकडे वा असो समेवर ब्रह्मांडाच्या पलीकडचे
शब्दांवर पण उगाच रुसती भाव सुरांच्या पलीकडले
अभंग ओवी गझल लावणी भारुड पोवाडा डफावर
पाय धरेवर बोल घुमविती लय तालाच्या पलीकडचे
रंगसंगती इंद्रधनूतिल सांगे उलगडुनी विज्ञान
कृष्णधवल आठवणींमधले घन रंगांच्या पलीकडले
भल्या पहाटे स्वप्न तिरंगी मनी रुजवते साखरझोप
घरट्यांमधल्या खग बाळांचे नभ पंखांच्या पलीकडचे
दुपार सुंदर झळाळणारी चंद्रकला नव अष्टमीची
हृदय जलावर गडद निळेपण अनुरागाच्या पलीकडले
वेलीवर उमलली जुई बघ पुतळा होता संध्याकाळ
कळी फुलाला गाव दावते हिमालयाच्या पलीकडचे
गडद जांभळ्या गुलबक्षीचा सांजेला आहार विहार
अत्तर दर्दी काटा उघडे कवच बुचाच्या पलीकडले
नव्हेच वेडा श्रावण हिरवा गदगद हलवे प्राजक्तास
रास फुलांची तळी साचली ऊन उन्हाच्या पलीकडचे
कशास मोजू समया साऱ्या तीन दोन वा समई एक
अंध रुढींना पोसे ना मन ते अंकांच्या पलीकडले
वाजूदे बारा वा तेरा रीत भात मम ठरवे मीच
घड्याळ माझे माझ्या हाती रव ठोक्यांच्या पलीकडचे
भृंग सुनेत्रा कीड पोखरे जरी भासतो कामचुकार
पूर्ण चंद्रमा झरे चांदणे मधुचंद्राच्या पलीकडले