श्रावण म्हणजे वाटण घाटण मऊसूत पुरणाची पोळी
रिमझिम धारांसम मम हलकी पाठीवर कर्माची झोळी
रान वाळले ग्रीष्मामध्ये गोळा केला लाकुड फाटा
श्रावणातली लगबग हिरवी डोईवर काष्ठांची मोळी
भूक शमविण्या चिल्यापिल्यांची चूल पेटण्या तिन्हिसांजेला
श्रावण बीवन चुलीत घालुन जाळे टाकुन बसला कोळी
भरतीच्या लाटांवर अवचित सळसळणारे मीन जलावर
भुकेजल्यांच्या गळास लागे वजनदार अलगद मासोळी
पर्व पर्युषण भादव्यातले तपवुन जीवा देय सुनेत्रा
पुण्यफळातिल जादा साखर घटण्या कटु सत्याची गोळी