पुण्यनगरी प्रिय जिवांची मिथ्य शक्तीचे न ठाणे
आवडे आत्म्यात मजला बिंब माझे मी पहाणे
उमलती काव्यात माझ्या अंतरीची भावपुष्पे
तोंडच्या वाफेवरी ना धावते मम मुक्त गाणे
बोलते बेधडक तरीही दुखविले ना व्यर्थ कोणा
बोलण्याचे टाळण्याचे धुंडते ना मी बहाणे
बाष्प पापातिल जलाचे दाटते मेघात जेव्हा
लोळुनी झिंगून पिंगुन बरळतो वारा तराणे
टिपुन घेती चिवचिवाटा नेत्र आणी कर्ण दोन्ही
अंगणी आलीत माझ्या पाखरे टिपण्यास दाणे
माणसांहुन विहग इतुके मधुर गाती जाण कारण
शिकविते सृष्टी खगांना जे पचे ते फक्त खाणे
चालले होते जरी ते सोडुनी मैफल सुनेत्रा
बरसला पाऊस अवचित परतुनी आले शहाणे