मुक्तक… जन्मोजन्मी ..
सौन्दर्याची दृष्टी ज्ञानी जन्मोजन्मी
सद्धर्माचे पाजे पाणी जन्मोजन्मी
मुनी मनातील मौन व्रताचे करू पारणे
प्राशुन आगम धारा वाणी जन्मोजन्मी
गझल … जथा..
कथा कुणाची व्यथा कुणाला
भृगू स्मृतीची प्रथा कुणाला
भरून गाणे उरात पोकळ
फुका पुकारे जथा कुणाला
कुणास भावे उकल कराया
कपात चर्चा वृथा कुणाला
उजाड राने रिते जलाशय
म्हणेल पृथ्वी पृथा कुणाला
लिहून द्यावी अता कशावर
गझल समीक्षा कथा कुणाला
भरकटलेली हतबल डोकी
कसे म्हणावे तथा कुणाला
कुणी न ठाके उभे “सुनेत्रा”
म्हणेल सागर मथा कुणाला