गाठायाला हवीहवीशी मंजिल बाई..नोटांचे मज लागत नाही बंडल बाई…
सुयोग्य व्यक्तिला मत दे तू अचल मनाने..नकोस झुलवू मनास अपुल्या चंचल बाई…
पाचोळ्याने भरून गेले जंगल बाई..कूडा कचरा गोळा करते त्र्यंगुल बाई…
शेर असूदे पाच सहा वा सतराशेही..त्यांची चाले गझलेमधुनी दंगल बाई…
घरात सखये वीज न आली कोसळली ती..माळ्यावरचा घेच पुसाया कंदिल बाई…
अर्थ किती तू छान काढिशी गझलांमधुनी..तुझा चालतो गझलेवरती अंमल बाई…
काहीबाही लिहितानाही ध्यान असूदे..गझलकारिणी गझल लिही तू मंगल बाई…
सहजपणाने फिरली बोटे केसांमधुनी..मुक्त “सुनेत्रा” तुझे लहरती कुंतल बाई…