झुळझुळणारी भरारणारी लहरत झिंगत गुणगुणणारी हवा हवी मज
श्वास घ्यायला प्राणवायूयुत पानांमधुनी सळसळणारी हवा हवी मज
भूमीवर हिरवाई राने फळाफुलांच्या फुलण्या बागा सृष्टीमाते
जलदांचा रथ मुक्त धावण्या बिजलीसंगे कडाडणारी हवा हवी मज
जीवात्म्यांची मौनी भाषा टिपण्यासाठी खिरण्यासाठी सर्वांगातुन
डोंगरमाथे प्रपात चुंबित झऱ्यासंगती खळाळणारी हवा हवी मज
काव्यकुपीतिल अत्तर माझे अक्षर पुद्गल चिंब भिजवुनी टपटपताना
लिली चमेली चाफ्यावरचा उधळत सौरभ दरवाळणारी हवा हवी मज
गिटार तबला स्वरपेटीतिल सूर ताल लय सजल सुनेत्री तरंग उठता
छेडित तारा दिडदा दिडदा हृदयासंगे धडधडणारी हवा हवी मज