मंगलमय आरास रक्तिमा जणू उगवती लाल
मुखकमलावर ओष्ठ भाळ अन लाल जाहले गाल
फुटुन तांबडे झुंजूमुंजू दिसू लागल्या दिशा
पहाट वारा लुकलुक तारे झरली खिरली निशा
हळद माखुनी ऊन कोवळे बागडते निर्झरी
नीर भराया जळी उतरल्या तांब्याच्या घागरी
बनी केतकी चाफा हिरवा बकुळ फुलांचा सडा
सिंहकटीवर सहज पेलते पुण्य सुगंधी घडा
मुनी दिगंबर जिनानुयायी पिंछीधारी खरे
पंचपरमपद परमेष्ठींचे नित्य सुनेत्रा स्मरू