डोंगराच्या पायथ्याशी घे विसावा पावसा
तृप्त जल प्राशून पृथ्वी ठेव पावा पावसा
तिज समुद्रा भेटण्याची ओढ होती लागली
भेटली ती काय द्यावा तुज पुरावा पावसा
माणसांच्या कुंडलीतिल कर्मरूपी पिंजरा
पत्रिका मांडे स्वतः जो मुक्त रावा पावसा
वासनांची लाट अडवुन संयमाने तापता
चिंब भिजल्या मृत्तिकेचा रंग ल्यावा पावसा
केस सुकवी मेघमाला लोळणारे भूवरी
तूच आता ऊन नामक राग गावा पावसा