कुदळ फावडे नांगरधारी शेतकरी
हिरवे सोने कसून तारी शेतकरी
प्राणपणाने जवान लढती देशाचे
घास मुखीचा त्यांना चारी शेतकरी
रोखठोक द्या हिशेब अमुच्या रक्ताचा
म्हणतो आहे नको उधारी शेतकरी
स्वार्थांधांच्या देता हाती न्यायतुला
तोलायाला पडेल भारी शेतकरी
शिवार फुलवित करण्या भक्ती मातीची
दिल्लीच्या जातो दरबारी शेतकरी
रेशनचे तांदूळ मिळाया अजूनही
स्वस्त दुकानी करतो वारी शेतकरी
सारा भूमीच्या हक्काचा भरावया
करेल कैसी वेठबिगारी शेतकरी