छेडते न वीणेच्या तारा गाण्यासाठी गाण्यासाठी
शीळ घालता सुरभित वारा गाण्यासाठी गाण्यासाठी
तबला पेटी हवी कशाला साथीला मम ढग आणिक खग
जलदांमधल्या झेलिन धारा गाण्यासाठी गाण्यासाठी
ताडमाड नारळी पोफळी गगन चुंबिती गातो निर्झर
खुणावतो आसमंत सारा गाण्यासाठी गाण्यासाठी
तापतापुनी धरा जलाशय ढगोढगी बाष्पाची दाटी
वाफेचा उतरूदे पारा गाण्यासाठी गाण्यासाठी
रान जिवाचे करून फुलविन सम्यक शेती रत्नत्रयमय
मिथ्य रुढींचा तोडुन कारा गाण्यासाठी गाण्यासाठी
लहर हवेची शीत सुगंधित मेघ धावती सैरावैरा
तडतडती छपरांवर गारा गाण्यासाठी गाण्यासाठी
मातीवर रांगोळी हिरवी निळा नाचरा मोरपिसारा
म्हणे ‘सुनेत्रा’ नंबर मारा गाण्यासाठी गाण्यासाठी