पहा आरत्या झडू लागल्या
तैल कावळ्या झरू लागल्या
धवल पाकळ्या विणू लागल्या
दले बावड्या भरू लागल्या
श्याम श्वेत रंगात निसर्गी
पीत जांभळ्या भिजू लागल्या
आकुल व्याकुळ दुःख वेदना
पहा पेटल्या जळू लागल्या
नाकी कंकण इवले कुंदन
विजय साजऱ्या करू लागल्या
बघ वनदेवी मम माधुर्या
गर्द पालव्या फुटू लागल्या
करंज तेली बाया पोरी
पुऱ्या कडकण्या तळू लागल्या
रंग कोणता आज गडे हो
म्हणत सावल्या पळू लागल्या
नवरात्रीचा जागर गोंधळ
मुली जाणत्या दमू लागल्या
घोडे अन बैलांवर पैजा
सयी सावळ्या सजू लागल्या
कोटी कोटी रुपयांच्या राशी
मौन चांदण्या खिरू लागल्या
आनंदी मन गडे गातसे
सान भावल्या हसू लागल्या
डोल डोलती हिरवी राने
तटी झावळ्या हलू लागल्या
अष्टापद कैलास गिरीवर
बर्फ तागड्या चढू लागल्या
सृष्टी सुनेत्रा निर्मिलीस नव
सोन साखळ्या पटू लागल्या