देह मंदिरातिल आत्म्यावर हिरवळ मी तर सुकून जाण्या
सर्वांगी फुलल्या काट्यांवर हिरवळ मी तर सुकून जाण्या
दवात भिजल्या पहिल्या प्रहरी पहाटवाऱ्यासम तू येता
टपटपणाऱ्या प्राजक्तावर हिरवळ मी तर सुकून जाण्या
ग्रीष्माच्या काहिलीत वाळा घालुन भरता माठ जलाने
वाळमिश्रित त्या उदकावर हिरवळ मी तर सुकून जाण्या
सुगंध दशमीचे व्रत करुनी ऊद धूप जाळशिल जेंव्हा
धुपारतीतिल उदाधुपावर हिरवळ मी तर सुकून जाण्या
मंदिरातले खोड चंदनी गोल सहाणेवर फिरताना
उगाळलेल्या जलगंधावर हिरवळ मी तर सुकून जाण्या
फुले एकशे आठ आणली बकुळ तळीची जाप द्यावया
एक एक त्या बकुळफुलांवर हिरवळ मी तर सुकून जाण्या
अर्घ्य म्हणोनी स्वस्तिक रेखुन ग्रंथ ठेवला सुगंधाक्षरी
नवीन कोऱ्या त्या ग्रंथावर हिरवळ मी तर सुकून जाण्या