वादळाने घातला हैदोस कारण
जांभळांचे पक्व झाले घोस कारण
का असा पाऊस वाऱ्या कावलेला
कावण्याचे दे मला तू ठोस कारण
हे असे मौनात जाती मेघ अवचित
मूग गिळण्याचा मिळाला डोस कारण
का बरे ते टाळताती बोलण्याला
इभ्रतीचा जीवघेणा सोस कारण
ही अशी फुगलीत नगरे माणसांनी
जाहल्या वस्त्या नि वाड्या ओस कारण
कापले तू अंतराला फक्त अर्ध्या
मैल नाही मोजले तू कोस कारण
घातली गादी पलंगी फक्त त्यांनी
का बसू नव्हताच त्यावर पोस कारण
देतसे प्राणी बळी तो कैक वेळा
मूक जीवा देव म्हणतो सोस कारण
चढत जाते मज सुनेत्रा काव्यमदिरा
अंतरा साकी न म्हणते ढोस कारण