इलाहींच्या गझलेतील प्रतिमा आणि प्रतिके – ILAHINCHYA GAZALETIL PRATIMA ANI PRATIKE


इलाहींच्या गझलेतील प्रतिमा आणि प्रतिके :

इलाहींच्या गझलेतून निसर्ग प्रतिमांची जशी निसर्ग प्रतिमांची रेलचेल आढळते तशाच इतर प्रतिमा आणि प्रतीके पण आढळतात.
उदा.
अबोल अश्रू, सुखाची श्वापदे, आसवांचे दिवे, दुराव्यांचे गजरे, आसवांचा अनुवाद, वचनांची टरफले, व्यथेची शय्या, व्यथांचा काफला, हृदयाचे स्मशान, स्वप्नांचे कलेवर, आसवांचे गाव, आठवांचे आभाळ. नयनांची आरास, स्मिताची शाल. इ.
इलाहींच्या बऱ्याचश्या गझलांमधून प्रतिमांची संरचना इतक्या नेटकेपणाने झालेली असते की त्या प्रतिमा सौष्ठवावर मन लुब्ध होते, आणि त्या विशिष्ट भावस्थितीत मन रेंगाळत राहते.

‘ आले न फिरकता कधीच ज्यांना गावात गुलाबाच्या’ या गझलेत प्रेयसी आणि प्रियकर यांच्यासाठी गुलाब आणि फुलपाखरे या निसर्ग प्रतिमांचा वापर करून काटे या प्रतिमेचाही इतका समर्पक वापर केला आहेकी ही गझल वाचताना मन गुलाबांच्या गावात फिरून येते. गुलाब, फुलपाखरे आणि काटे या मग प्रतिमा न राहता एका विशिष्ट वृत्तीच्या व्यक्तींची प्रतीकेच बनतात.

आले फिरकता कधीच ज्यांना दारात गुलाबांच्या
असतील अशी ही फुलपाखरे गावात गुलाबांच्या

दरवळणारी कोमल काया रंगरूप लाघवी असे
खडा पहारा काट्यांचा नशिबात गुलाबांच्या

दर्शन नाही स्पर्शही नाही तरी कशी ही भुरळ पदे
कोणती अशी ही जादू किमया नावात गुलाबांच्या

सर्व अप्सरांच्या अधरांचे संमेलन जणु भरलेले
बघणारी हर नजर डुंबते गंधात गुलाबाच्या

मोर्चा अन घेराव फुलांचा संपावर वाटिका वने
पहा निवेदन जातसे म्हणे मी स्वप्नात गुलाबाच्या
सौंदर्याची खाण लाभली औदार्याचे भान असे
मकरंद दरवळे गंध इलाही हृदयात गुलाबाच्या

कुसळांची अन काट्यांची चराचरावर सत्ता आली
हे विश्व् इलाही रंगून जावे रंगात गुलाबाच्या

वरील गझल म्हणजे निसर्ग प्रतिमांचा जणू उत्सवच वाटते. वाटिकेतली गुलाबांची फुले म्हणजे जणू अप्सरांच्या अधरांचे संमेलन, गुलाबाच्या दारातील काटरूपी पहारेकरी, फुलपाखरांना गुलाबाच्या दारात फिरकताही येत नाही म्हणून जर ती स्वप्नात गेली तरी संपावर जाणारी वाटिका वने, चराचरावर सत्ता गाजवणारी कुसळे नि काटे आणि शेवटी हे विश्व गुलाबाच्या प्रेमरूपी रंगात रंगून जावं अशी व्यक्त केलेली मनोकामना सारं काही एवढं घाटदार आहेकी , ही गझल एक उत्कृष्ट गझल असूनही एक जिवंत कथाही त्यातून उलगडत जाते. त्यातलं लालित्य, चापल्य, मनाला वेडावून टाकतं. म्हणूनच इलाहींच्या गझलेतील प्रतिमा इतक्या जिवंत आणि चपखल असल्याने त्या प्रतिकेच बनतात.

साहित्यात प्रतीकांचा वापर साधारणतः कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यासाठी होतो. गझल या काव्यप्रकारातूनही एका शेरामधून पूर्ण कवितेचा आशय व्यक्त करायचा असल्याने प्रतिमा व प्रतीकांचा मुक्त वावर गझलेत न आढळला तर नवलच म्हणायचे.

‘ जखमा अशा सुगंधी’ या संग्रहातील (पृ.७१)
‘नको काळजी करूस माझी खरेच आई खुशाल आहे ‘ या गझलेत आलेले काफ़िये पाहिल्यास त्यांना प्रतीकेच म्हणावे लागेल. दुशाल , महाल, मशाल, मृणाल या काफियांची प्रतीकेच बनली आहेत.
या गझलेतला पुढी शेर;

‘फक्त सोसणे तिजला ठाऊक केवळ खस्ता तिच्या नशिबी
कमळ फुलासम तिला लेकुरे आई म्हणजे मृणाल आहे’

यात मृणाल म्हणजे कमळाचा देठ जो पाण्यात असतो. कमळफुलांना तो जीवनरस पुरवतो.यात मृणाल आणि कमळफुले ही आई आणि लेकरांचे प्रतीक म्हणून आलेली आहेत.
गझलेत आवश्यक असणारी रदीफ आणि काफ़िये ही गझलेची सौंदर्यस्थळे असतात, या रदीफ आणि काफियांचा उपयोग प्रतिमा आणि प्रतीके म्हणून करून घेण्यात उत्तम गझलकार निपुण असतो. इलाहींकडे हे कसब उपजतच असल्याने प्रतिमा आणि प्रतिकात आपोआपच रूपांतरित झालेल्या काफियांचे अगणित शब्दभांडार त्यांच्या गझलांमधून पाहायला मिळते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.