ओढाळ पाणी धावते रानी फुले पाने झरे
पाऊस गाणी गावया कोणी इथे आले बरे
गोठ्यात धेनू अंगणी चाफा फुलांनी लगडला
जात्यात दाणे सांडते पीठी तशी ओवी झरे
आकाशगंगा सावळ्या मेघा म्हणे जा रे घना
शेतात ज्वारी बाजरी डोले कणिस मोतीभरे
उडतात पक्षी देखणे फांदीवरी घरटे झुले
चाखावया मकरंद मध पुष्पांवरी फुलपाखरे
बगिचे नवे झाले किती हे भ्रमर पण आले नवे
रक्षावया या परिसरा माळी नवे आणू खरे
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा.