पुन्हा पान कोरे कसे आज सुंदर
कळ्यांचे फुलांचे खुले राज सुंदर
फुलावी खुलावी नव्हाळी उषेची
उन्हाने दवाचे नवे साज सुंदर
गुलाबी रुपेरी हवा सागरीही
तिची मी समुद्री निळी गाज सुंदर
जशी बोट नादात कंपात चाले
तसे अंतरात्म्यात आवाज सुंदर
तुला आठवोनी धुके मुक्त विरुनी
सुनेत्रात माझ्या उभे ताज सुंदर
लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/
मात्रा-२०