विकृतीशी युद्ध करते श्रेणिकांची लेखणी मी
संस्कृतीला मुक्त करते श्रेणिकांची लेखणी मी
अन्नदात्री मायभूमी तृप्त होउन गावयाला
जैनियांना मुग्ध करते श्रेणिकांची लेखणी मी
ऐतिहासिक दस्तऐवज नेटवरती जतन करण्या
गाळशाई शुद्ध करते श्रेणिकांची लेखणी मी
ललित साहित्यात आणुन पारिभाषिक शास्त्रसंज्ञा
गंड सारे लुप्त करते श्रेणिकांची लेखणी मी
साठल्या पाण्यात जंतू वाढल्यावर ऊन्ह बनुनी
दलदलीला शुष्क करते श्रेणिकांची लेखणी मी
कलमरूपी शस्त्र परजत पाडते गारा दुधारी
कातळाला वृद्ध करते श्रेणिकांची लेखणी मी
पाडण्या पाऊस धो धो भावनांचा मी ‘सुनेत्रा’
धवल मेघा कृष्ण करते श्रेणिकांची लेखणी मी
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २८)
लगावली – गालगागा/ ४ वेळा
स्वर काफिया गझल