विकृतीशी युद्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी
संस्कृतीला मुक्त करते आत्मतत्त्वी लेखणी मी
अन्नदात्री मायभूमी तृप्त होउन गावयाला
जैनियांना मुग्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी
ऐतिहासिक दस्तऐवज नेटवरती जतन करण्या
गाळशाई शुद्ध करते आत्मतत्त्वी लेखणी मी
ललित साहित्यात आणुन पारिभाषिक शास्त्रसंज्ञा
गंड सारे लुप्त करते आत्मतत्त्वी लेखणी मी
साठल्या पाण्यात जंतू वाढल्यावर ऊन्ह बनुनी
दलदलीला शुष्क करते आत्मतत्त्वी लेखणी मी
कलमरूपी शस्त्र परजत पाडते गारा दुधारी
कातळाला तेज देते आत्मतत्त्वी लेखणी मी
पाडण्या पाऊस धो धो भावनांचा मी “सुनेत्रा”
धवल मेघा कृष्ण करते आत्मतत्त्वी लेखणी मी
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २८)
लगावली – गालगागा/ ४ वेळा
स्वर काफिया गझल