नित्य प्राशिते जिनवाणी मी
कधी न गाते रडगाणी मी
छिंद छिंद अन भिंद भिंद तो
क्रोध करूया तू आणी मी
घरात परिमल पसरवणारी
मेजावरली फुलदाणी मी
कडेकपारीतून वाहते
शीतल खळखळते पाणी मी
ईश्वर म्हणतो, हृदयी काष्ठी
जळी स्थळी अन पाषाणी मी
करकर करते पायताण मम
म्हणून चाले अनवाणी मी
काव्यकोंदणी लखलखणारी
अक्षररूपी गुणखाणी मी
टंकसाळ मृदु सत वचनांची
खणखणती पाडे नाणी मी
हरेक ओंजळ भरुन सांडण्या
हात देतसे क्षत्राणी मी
लक्ष्य भेदण्या टोकावरच्या
वर वर जाणाऱ्या बाणी मी