जाणिवेचे नेणिवेशी पटत गेले
मैत्र माझे अंतराशी जुळत गेले
भूतकाळाला न पुसले जागले मी
वर्तमानी मम भविष्या रचत गेले
काष्ठकाट्यांचाच मंचक घनतमासम
झुलत त्यावर ग्रह नभीचे टिपत गेले
लाकडाला हृदय नसते पण तरीही
करुन त्याची स्वच्छ पाटी झरत गेले
वासनांच्या वादळांना थोपवीण्या
वादळांशी लेखणीने लढत गेले
भावनांचे अर्घ्य वाहुन तुज निसर्गा
गात गाणे नित्य मोदे जगत गेले
कोण ही कोठून येते चषक भरण्या
हीच ती साकी सुनेत्रा स्मरत गेले