चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता
कुणी न बघते कसे फुलांच्या जपायचेरे मनास आता
अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया
खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ तू सुवास आता
जुनाट कर्मावरी उतारा मलाच देते जहाल साकी
तयांस प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता
भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले
करुन गिलावा पुन्हा तुझ्या रंगवेन गझले घरास आता
भकास वाडा भुयार दगडी तिथे कशाला भुतास शोधू
करेल कोणी विचार उलटा धुवेन सुलटे तयास आता
नकोच आंबट धुवट अदमुरे पचावयाला सहज असे जे
दही मिळाया मधुर चवीचे विरजवते मी दुधास आता
पराजयाची अन विजयाची तुलाच मूढा असेल चिंता
अमूढ मी बघ जिती सुनेत्रा करात झेले जयास आता