शेतकऱ्याला कष्टकऱ्याला पिळवुन घेशी, घडा भराया कर्मांचा
शंभर वर्षे सरली भरली बघणाऱ्यांची, धडा लिहाया कर्मांचा
परीट धोबी रजक अगस्ती नावे मिरवित, बडव बडवती रोज धुणे
पिळुन सुकवती दोरीवरती ऊन हवेने, चुडा फुटाया कर्मांचा
नागिण फिरते विहिरीवरती ये बाहेरी, वारुळ फोडुन सळसळुनी
नागोबा होऊन डोल रे फणा उभारुन, खडा पडाया कर्मांचा
चपळ लेखणी ज्वलंत प्रश्नांवरती लिहिते, आंतरजाली खणखणते
किवड्या झालेल्या मूढांच्या कानांमधला, दडा निघाया कर्मांचा
कैक कुणबिणी सगे सोयरे लावण तरुची, करण्या येती बिगीबिगी
मम पलित्याने आग लावुनी कुड्यास पेटव, किडा जळाया कर्मांचा
सहज लिहाया नकोच बाऊ तंत्र व्याकरण, गण मात्रांचा कवितेला
गझलियतीने गझल लिहावी अर्थभावघन, वडा तळाया कर्मांचा
कुणी न बसते डोईवरती मिऱ्या वाटण्या, अंक अक्षरे मोजु नको
चतुर्दशीला जा ठेल्यावर त्रयोदशगुणी, विडा मिळाया कर्मांचा