टोक गाठणे आवडते मज
तिथुन पाहणे आवडते मज
टोकावरती आसन ठोकुन
स्वतःत रमणे आवडते मज
कातळातला झरा प्रकटण्या
त्यास फोडणे आवडते मज
खडे कुणीपण कैक टाकुदे
खडे काढणे आवडते मज
पायवाट शोधून स्वतःची
तिला मळवणे आवडते मज
ताज्या ताज्या लिहून गझला
रतिब घालणे आवडते मज
श्रुतपंचमीस विनम्र भावे
शास्त्र वाचणे आवडते मज