गहिवर – GAHIVAR


अक्षर अक्षर तापवले ..
प्राण फुंकले श्वासामधुनी .
दवबिंदूंनी त्यांस शिंपले…
परिमल घेऊन झुळूक आली ..
सुरभीत झाली शब्दफुले …
लहर नाचली वाऱ्याची ..अन
गहिवर आला भाव भराया
दहिवर जैसे ..
शेतामधल्या साळीवरती…
सृष्टिमाता प्रसन्न हसली…
खुद्कन गाली…
गालावरच्या खळीत तिचिया..
अंकुरले बीज.. ओले..भिजले…
हळू हळू ते रुजले खुलले..
पर्णांच्या जोडीतून हसले…
प्रकाश पाणी वाऱ्यासंगे ..
तरू वाढले…
सुगंध उधळत फुले उमलली …
फुलाफुलातून रसमय सुरभीत ..
पक्व फळांची बाग बहरली…
रात्र चांदणी गात बरसली..
पहाटवाऱ्यासंगे किलबिल …
धरणीला जागवू लागली…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.