मीठ नि मिरची हिंग मोहरी नजरउतरवे भरभर मी
तप्त निखारे दृष्ट काढुनी तिथे फेकते झरझर मी
अंतर मिटण्या अंतरातले जपू कोणता मंतर मी
प्रश्न मिटे पण शब्द वितळती भरे अक्षरी कर्पुर मी ..हुस्ने मतला १
जिनवाणीतिल भाव जोडुनी जिना बांधते मंदिर मी
किणकिणणारे वात लहरता कधी त्यातले झुंबर मी … हुस्ने मतला २
वृत्त जपूकी मुक्तछंद जो उडे बागडे स्वैरपणे
जे सुचते ते सहज उमटता करू व्यर्थ का कुरकुर मी
सृष्टी जपण्या जीव जगविण्या दवा जादुई मिळवाया
तपवुन विरजुन मौन भावना ताक घुसळते भरपुर मी
केव्हां होती बर्फ भाव मम कधी सुगंधी तरल हवा
सत्य अहिंसा धर्म प्रिय किती कसे मारु मग कंकर मी
थरथरणाऱ्या गर्द झावळ्या तशी कापरी घन छाया
छायांकित मन अचल व्हावया करे उगाचच गुरगुर मी
दाहि दिशातुन गस्त घालते नयन रोखुनी भिरभिर मी
नय नजरेचा तोल राखते जरी भासते मग्रुर मी….हुस्ने मतला ३
कर्म निकाचित खाक जाहले नवा सुनेत्रा मंत्र जपू
गझल गरजता गात राहते ” फुलू फुलवुया ” घरभर मी
लगावली – गागागागा / गाल गालगा / लगा गालगा / गागागा /
मात्रा ३०… ८ /८/ ८/ ६