मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान…
‘ जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’
‘जखमा अशा सुगंधी’ या गझलकार श्री, इलाही जमादार या पहिल्याच गझल संग्रहातल्या एका गझलेतील हा शेर.
जखमा अशा सुगंधीनंतर इलाहींचे एकूण चार ग़ज़ल संग्रह अणि मुक्तक व् रुबायांचा एक संग्रह प्रकाशित झाला. मराठी गझल जगतात सर्वाधिक गझल संग्रह ज्यांच्या नावावर आहेत असे श्री. इलाही जमादार हे एक गझलकार आहेत.
त्यांचे गझल संग्रह फक्त संख्येनेच जास्त नाहीत तर त्यांच्या प्रत्येक गझल संग्रहाची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. काही गझल संग्रहांची तर वेगळे प्रयोग म्हणून दखल घ्यावी लागते. (उदा. ‘तुझे मौन’ आणि ‘सखये’)
अगदी अलीकडेच प्रकाशित झालेल्या आपल्या मोगरा या गझल संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात, “माझ्या प्रिय मोगऱ्याने केलेल्या सुगंधी जखमांचा दरवळ केवळ काळजापुरता सीमित न राहता त्याचा परिमल आख्ख्या महाराष्ट्रभर घमघमत आहे. या एकाच शेराने मला केवळ सुगंधीच नाही केले तर तेजोमयही केले. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. केवळ त्याच्याच प्रेरणेने मी इतका लिहू शकलो. अजूनही माझ्या लेखणीचा बहर कायम आहे. ”
असा लेखणीचा बहर जिवंत ठेवणाऱ्या काळजाला झालेल्या सुगंधी जखमा आणि त्यांचा सुवास इलाहींच्या प्रत्येक गझल संग्रहातून दरवळत असतोच. त्यांच्या गझल संग्रहांचं ते वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.
कवी इलाहींनी नव्या आशयाच्या नव्या ढंगाच्या, नव्या रंगाच्या गझला लिहून मराठी गझल विश्वात एक नवे भान निर्माण केले. त्यांनी गझलेच्या बाबतीत मळलेल्या वाटेवरून न जाता आपली एक वेगळीच वाट निर्माण केली. ती वाट इतरांनाही चोखाळता यावी म्हणून मुक्तपणे मार्गदर्शन केले. गझलेच्या सावलीतून ते स्वतःही चालत राहिले आणि असे चालत असताना येणाऱ्या इतर पावलांनाही ते मार्ग दाखवू लागले. गझलेबरोबर झालेली त्यांची हृदयभेट त्यांच्या इतकीच इतरांनाही प्रेरणादायक ठरली. ती अशी;
ओळखीची दोन हृदये भेटली परक्यापरी
पाऊले घेऊन मजला चालली परक्यापरी
मी जिच्या छायेत माझे बांधले घरटे नवे
राहिली माथ्यावरी पण सावली परक्यापरी
गर्द हिरव्या वेदनेची बाग माझी बहरली
हाय ! माझी आसवे मी वेचली परक्यापरी
इंग्रजी काव्यातील स्वच्छंदतावाद(रोमँटिसिझम) मराठीत प्रथम आणणारे कवी म्हणून कवी केशवसुत ओळखले जातात.
सृष्टीचे मनोव्यापार आणि जीवन व्यापार ऋतूंचे सोहळे, प्राणिमात्रांचे जीवन यांचा स्वतःच्या अंतःचक्षूंनी शोध घेऊन तो काव्यात मांडण्याचा प्रयत्न रोमँटिक प्रकारच्या काव्यात केला जातो. त्यामुळे मानवी मनातील सुखदुःखे, प्रणय भावना, कुतुहूल, आशा निराशा, असे साधे विषयही काव्याचा विषय बनू लागले.
अशाच प्रकारचा स्वच्छंदतावाद कवी इलाहींनी मराठी गझलेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्कट आत्मविष्कारातून कवी मनातला निसर्ग, कवी मनातले चांदणे, गझलेत उतरले.
जखमा अशा सुगंधी या संग्रहातील ‘शीक एकदा खरेच प्रीत तू करायला’ आणि ‘निशिगंध तिच्या नजरेचा’ या गझला मराठी गझलेत आपल्या अंतःसत्वाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या ठरतात.
‘ काव्यप्रकाश’ या ग्रंथात मम्मटांनी रसाची व्यावहारिक व्याख्या अशी सांगितली आहे.
कोप्य लौकिकः आनंद रसः
म्हणजेच एक प्रकारचा अलौकिक आनंद म्हणजेच रस होय. अशा काव्यरसात डुंबायला लावणाऱ्या गझला इलाहींनी विपुल प्रमाणात लिहिल्या. राग लोभ मत्सर टीका टिप्पणी हेवेदावे या भावनांमध्ये अडकून पडलेल्या गझलेला त्यांनी रमणीय काव्यजगतात आणून सोडले.
विशुद्ध भाव गझल :
इलाहींच्या प्रेम या विषयावरच्या काही गझलांना तर विशुद्ध भाव गझल हाच शब्दप्रयोग वापरावा लागेल.
गझल हे काव्य आहे म्हणून भावकवितेप्रमाणे भाव गझल असाही प्रकार गझलेत असणे स्वाभाविकच आहे. विशुद्ध भावगझलेत विशुद्ध भाव कवितेची सर्व लक्षणे असतातच. ही गझल विशुद्ध सौंदर्याचेच दान करते. काव्यरसिक त्याचा रसास्वाद घेताना त्याचे आकंठ पान तर करतोच पण आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे त्याचे वेगवेगळे अर्थही लावत असतो. त्या दृष्टीने पाहिल्यास विशुद्ध भावगझल म्हणजे अनेक अर्थच्छटा असणारे लोभसवाणे इंद्रधनूच असते.
कवी हा एक चैतन्यमय पिंड असल्याने तो कवितेचे मातृत्व अनुभवतो. ते व्यक्तही करतो. निर्मितीपूर्व अवस्था ही कवी मनाची एक यातनामय अवस्था असते. पण निर्मितीनंतर मनाला लाभणारा आनंद शांतता ही एक विलक्षण अनुभूती असते. विशुद्ध भावगझलेमधून केंव्हा केंव्हा आस्वादकही अनुभव व अनुभूती या दोहोंमधली अवस्था अनुभवत असतो. प्रिय व्यक्तीच्या विरहाने कोसळणारे मन त्यात घोंगावणारं वादळ, थरथरणारं काली, गालावर ओघळणारे अश्रू आणि रडणारे हृदय, चेहऱ्यावर दाटलेले मळभ, मनात न मावणारी पूर आलेली नदी आणि त्या पाण्यावर तरंगणारा मनातल्या विकारांचा संसार … या सर्वांचं एक हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे करणारी ही इलाहींची गझल म्हणजे एक विशुद्ध भावगझलच आहे. त्यातले हे तीन शेर पहा ;
वादळ घोंगावत होते पाऊस कोसळत होता
काळीज थरथरत होते पाऊस कोसळत होता
बाहेर आत पागोळ्या भिंतीवर जल रांगोळ्या
घर स्वतःच बरसत होते पाऊस कोसळत होता
गावात नदी शिरलेली शिरकाण घरांचे झाले
संसार तरंगत होते पाऊस कोसळत होता
वाट्याला आलेले एकाकीपण स्वविकारण्यासाठी कमालीच्या सोशिकपणाची गरज असते. कधी कधी हे एकाकीपणच कवी प्रतिभेला वरदान ठरते. पण असा सोशिकपणा असण्यासाठी मनाचे दरवाजे काहीवेळा सताड उघडे ठेवावे लागतात. अशी कला अवगत असणारे गझलकार म्हणून इलाहींचे वेगळेपण जाणवते. माणूस म्हणून जगण्यासाठी हा सोशिकपणा तर स्वीकारावा तर लागतोच. पण त्याचे पडसाद त्यांच्या काव्यातूनही उमटतात. पण तरीही त्या उमटण्यात कसलाही आक्रस्ताळेपणा न दिसणे हे विशुद्ध काव्याचे खरे गमक आहे.हे दुःख कमालीच्या संयमाने काव्यात उमटल्याने त्याला कारुण्य प्राप्त होते. पण हे कारुण्य कीव उत्पन्न करणारे नसते.
दुःख मग ते कसलेही असो, विरहाचे असो, अपमानाचे असो किंवा सततच्या ठेचकाळण्याचे असो ते कधी मनाला जाळत जाते तर कधी पोळत जाते.कधी मनाला भिजवून चिंब करते. या साऱ्या भावभावनांचे कढ जेंव्हा आवारात नाहीत तेंव्हा भल्याभल्यांच्या संयमाचाही बांध फुटतो. हे दुःखाचे कढ संयमाचा बांध फुटून जेव्हा ओघळू लागतात तेंव्हा ते इतके विशुद्ध झालेले असतात की त्यांना खाजगीपणाचा किंचितही दर्प येत नाही. वैयक्तिक जीवनातल्या दुःखाचे वेदनांचे कुठलेही संदर्भ त्यातून उमगत नाहीत.
इलाहींच्या गझलांना विशुद्ध भावगझल म्हणण्यामागचे मागचे प्रयोजन हेच आहे. गझलांमधून दुःख भावना जरी व्यक्त होत असली तरी त्यातून दैन्य न जाणवता तिचे दर्शन सुखाच्या भावनेइतकेच मोहक आणि दरवाळणारे असते. कविता आणि गझल यातल्या दुःखात नेमका हाच फरक असतो. गझलेतल्या दुःखाची जात दरवळणारी जाते. हा दरवळ मनाला जाळणारा पोळणारा असतो आणि सरतेशेवटी निवत जाणाराही असतो. अर्घ्य ह्या संग्रहातील इलाहींची ही गझल ,
प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण
निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण
एकाकीपण हा रदीफ असणारी आहे , पण या एकाकीपणाने त्यांची गझल कधी खचलेली वाटत नाही, ती कोसळत नाही की खुरटत पण नाही किंवा करपतही नाही. उलट तिला वेगळेच धुमारे फुटतात. गर्भस्थ दुःखालाही पालवी फुटून त्यांची गझल आतून आतून फुलत जाते. त्यांच्या गझलेत दुःखाचे प्रदर्शन नसून त्या दुःखाच्या गाभ्यालाच हात घातल्याने त्यांच्या गझलेचे अंतरंग आणि बहिरंगही समृद्ध झाले आहे.
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांची आस्वादात्मक समीक्षा
पृष्ठ क्र. २२ ते २५ वरून साभार