बंध बांधतात जीवाला संसार मग सुरु होतो,
भावभावनांचा आस्रव होता पालवी फुटुन हिरवा होतो.
नातीगोती फांद्यांसमान पानाफुलांनी बहरून जातात,
सहा ऋतूंचे चक्र त्यातून हळूहळू फिरत राहतात.
मातृपितृधर्म स्मरून सहज व्हावीत कर्तव्ये,
व्यवहार निश्चय जपत जपत सांभाळावे घर आपले.
कधी थोडे कठोर व्हावे स्वतःस शिस्त लावावी,
हृदयामधले मंदिर मूर्ती ध्यान लावून पाहावी.
आपलेच कर्म आणि इच्छा जाणून नीट घ्यावा कौल,
तन मन धन अर्पून अस्तित्वाचे जाणावे मोल.
जीव अजीव आस्त्रव बंध संवर निर्जरा मग मोक्ष,
सात तत्त्वे तत्त्वार्थाची कराच आता सोक्ष मोक्ष
अनेक भवांच्या यात्रेतून मनुष्यजन्म मिळाला आहे,
समाधानी आणि चौकस स्वभाव माझा धर्म आहे.