तरही गझल – कंटकांचा हार झाला
मूळ गझल – घुसमटीचा केव्हढा सत्कार झाला
गझलकार – राज पठाण
घुसमटीचा केवढा सत्कार झाला
आतला आवाज पुरता ठार झाला
बोलले होते जरी ते बोचणारे
बोचऱ्या त्या कंटकांचा हार झाला
लेखणीने दाबता नाना कळांना
शेर माझा वीजवाहक तार झाला
वितळलेल्या भावनांना अर्थ देण्या
गोठवुन पाल्हाळ तो मग सार झाला
केवढा आधार त्याला कुंपणाचा
त्यावरी चालून खंदक पार झाला
फक्त केले प्रेम तुजवर लिहुन गझला
लिहित जाता का तुझ्यावर वार झाला
जाहली घायाळ स्वप्ने लोचनातिल
ताज पण त्यातूनही साकार झाला
अक्षर गण वृत्त – मात्रा २१
लगावली – गालगागा/ गालगागा/ गालगागा/