गोठून आसवांचा मज भार होत आहे
एकेक आसवाची घन गार होत आहे
गारा भरून कळसा घेता कटीवरी मी
विळख्यातुनी विजेचा संचार होत आहे
गोष्टी कपोतवर्णी स्मरणात साठलेल्या
वितळून त्या उन्हाने अंधार होत आहे
ज्याचे तया कळावे केल्या किती चुका ते
घेतात सोंग म्हणुनी व्यापार होत आहे
अक्षर लुटून वाणी झरते खुशाल जेव्हा
मी कापण्या मुखवटे तलवार होत आहे