तरही गझल – खरे बोलणे वेड आहे खरे
(गझलेची पहिली ओळ,ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा…आदरणीय कवी राज पठाण यांची)
ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा
कसा रोज वाटे नव्यासारखा
झरोक्यातुनी चंद्र दिसतो मला
जणू सोनचाफा दिव्यासारखा
जुळे भाव ना पण जुळे काफिया
थकुन शेर बैसे खुळ्यासारखा
पुसावी लिहावी गझल मी सदा
तुझा शेर यावा निळ्यासारखा
निळ्या या नभाची मला ओढ रे
नभातून ये चांदण्यासारखा
तुझे बोल गझले कसे मी टिपू
छळे वात वेडा पिल्यासारखा
कुणी सांगते छंद नाही बरा
चिरे शब्द सुंदर विळ्यासारखा
खरे बोलणे वेड आहे खरे
खऱ्याचाच गुंता तिढ्यासारखा
निशेचीच जादू अता पांघरू
तिचा रंग चढतो विड्यासारखा
अक्षरगणवृत्त – मात्रा १८
लगावली – लगागा/लगागा/लगागा/ लगा/