जिनसूर्य तू जिनचंद्र तू जिनबिंब तू
मम अंतरीच्या भावरंगी चिंब तू
मी मोजते ना बीजपंक्ती अर्थदा
आरक्तवर्णी फाकले डाळिंब तू
उत्सर्पिणी अवसर्पिणी काळातल्या
चंद्रार्क तनुवर सिद्धस्वरुपी टिंब तू
नांदावया अंकांसवे स्वर अक्षरे
काट्यांत मी जो नेसले तो लिंब तू
दाटून अंतर गीत झरता भावना
ग्रंथीत उरले बीजरूपी डिंब तू
वाळून जाता शाकभाज्या माळवी
घोळून तिखटी वाढशी आळिंब तू
रक्षावया ऋद्धी सुनेत्रा विक्रिया
मम अंगणीचा जाणता कडुनिंब तू