बकुळ फुलांची भरली ओंजळ सांडत आहे
सुख शांती अन हर्ष अंतरी गाजत आहे
कनक पाटल्या कंच पाचु वन कंकण किणकिण
नजरबंद मम नजराणा मन पाहत आहे
कुरळ कुंतली रत्न चुडामणि काजळ नयनी
अधरी वेणू हळदी रंगी वाजत आहे
कानी कुंडल जास्वंदीचे हलती डुलती
भाळी कुंकू चंद्रकोर चिर शोभत आहे
गाणे गाता खळखळ निर्झर कोकिळ भारद्वाज
सुनेत्रातली गझल शिवारी डोलत आहे