चोरखण – CHOR KHAN


ठेव प्रतिष्ठा तुझी पणाला सत्यासोबत
कधीतरी मज भेट सणाला सत्यासोबत

लख्ख झळाळी मम पर्णाला सत्यासोबत
शिव सुंदरता मन स्वर्णाला सत्यासोबत

नजराणा धन नकोच लुगडे बोल मोकळे
लाव सुपारी चोरखणाला सत्यासोबत

जीवांचे कैवारी जीवच लढत राहती
अभय मिळाया वनहरणाला सत्यासोबत

संयम मार्दव संगे शुचिता आर्जव तपवुन
मिरची तडका दे वरणाला सत्यासोबत

दिला दाखला न हयातीचा मतदानास्तव
ओढुन काडी घे सरणाला सत्यासोबत

गचपण काढुन सरपण मिळण्या हवा खेळण्या
हवी खुरपणी तृणातणाला सत्यासोबत

दुक्कड सनई असो दुक्कडम भल्याभल्यांची
उडेल फे फे क्षणाक्षणाला सत्यासोबत

प्रश्न ऐरणीवरती येता बळ सम्यक्तवी
दो हातांचे येय घणाला सत्यासोबत

क्षेत्र रक्षिण्या कैक जण जरी प्रीत व्यापते
ब्रह्मांडाच्या कणकणाला सत्यासोबत

थडथड दातांची थोपविण्या थापुन यावे
दातांवरती दातवणाला सत्यासोबत

घन गझलमय कृष्ण बरसता मेळ्यामध्ये
गात घुंगरू मिळे गणाला सत्यासोबत

मैत्रीची परिभाषा अस्सल चोख “सुनेत्रा”
झाली भारी टनामणाला सत्यासोबत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.