पंचकल्याणिक कुणाचे बोल रे तीर्थंकरा
इंद्रियांचे की जिवाचे सांग रे तीर्थंकरा
गणधरांनी संप केला बैसले ध्यानात ते
समवशरणच ओस पडले ऊठ रे तीर्थंकरा
शस्त्रधारी भक्त येता मौन शासनदेवता
मौन त्यांचे सुटत नाही वाच रे तीर्थंकरा
ठासलेल्या लेखण्या या मायभूच्या रक्षणा
तूच आता चाप त्यांचा ओढ रे तीर्थंकरा
पंचभूते भडकलेली उदक नाही औषधा
अर्घ्य तुज देण्यास अश्रू ढाळ रे तीर्थंकरा
कैक पात्रे वाट बघती प्राशण्या वाणी तुझी
घडविण्या पात्रांस हलके ठोक रे तीर्थंकरा
गझल लिहिते गझल गाते मी सुनेत्रा रंगुनी
गझल माझी ऐकण्याला भेट रे तीर्थंकरा