नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके
घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके
हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी
दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके
स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे
भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके
पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई
स्वागत करण्या, पद्मावतिचे, सज्ज जाहले, गुच्छ बुके
वारा उडवी, श्यामल माती, जलात भिजते, वृक्षतली
सौरभ भरण्या, मग मृदगंधी, बकुळ फुलांची, रास सुके
सोनपिंजरे, तोडुन फोडुन, पोपट मैना, मुक्त उडे
झाडांवरच्या, राव्यांसाठी, पेरूची बघ, बाग पिके
मीच ‘सुनेत्रा’, मीच सुनयना, कुंकवातली, हळद-परी
म्हणून ओल्या, माझ्या भाळी, टिकली आणिक, खडा टिके
मात्रावृत्त – १६+१४=३० मात्रा