सत्पात्राला दान द्यावया पसा भरावा वेळोवेळी
झऱ्याजवळच्या शेतामधला मळा कसावा वेळोवेळी
काच मनाची नको तापवुस त्यापेक्षा ती नितळ राहण्या
ऐनक असुदे अथवा ऐना स्वच्छ करावा वेळोवेळी
असो मंदिरी कचेरीतही झुंबर किणकिण हलता झुलता
भगवंताच्या मोक्षपथाचा वसा जपावा वेळोवेळी
मुनी दिगंबर उभे ठाकता पूज्यपाद ते स्मरुन अंतरी
दर्शन घेता भाव भक्तीचा उचंबळावा वेळोवेळी
नाव गाव पर्याय वेगळा असो आत्मिया.. अर्घ्य द्यावया
ओंजळीत मम दवबिंदूंचा घन बरसावा वेळोवेळी