थबकुनी अंदाज घेतो शेर माझा
आगळ्या डौलात येतो शेर माझा
भावनांचे मेघ तपुनी थंड होता
अंतरी चाहूल देतो शेर माझा
पाहता मुनीराज ध्यानी मौन विपिनी
बैसतो त्यांच्यापुढे तो शेर माझा
कैकवेळा खोडुनी मी परत लिहिता
पूर्वभव कुठला स्मरे तो शेर माझा
जाग येता मज पहाटे शांत समयी
शिखरजी यात्रेस नेतो शेर माझा