चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता
तयां अता लागले कळाया कसे जपावे फुलास आता
अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया
खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ रे सुवास आता
जुनाट कर्मांवरी उतारा मलाच पाजे जहाल साकी
तयास प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता
भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले
करुन गिलावा पुन्हा तुझ्या रंगवेन गझले घरास आता
भकास वाडा भुयार दगडी कुठे कशाला भुतास शोधू
करेल कोणी विचार उलटा धुवेन सुलटा तयास आता
नकोच आंबट धुवट अदमुरे पचावयाला सहज असे जे
दही मिळाया मधुर चवीचे विरजवते मी दह्यास आता
पराजयाची अन विजयाची तुलाच मूढा असेल चिंता
अमूढ बघ मी जिती सुनेत्रा करात झेले जयास आता
लगावली- लगाल गागा / ४ वेळा