ग्रास मुखातिल उदरी नेई निळसर हिरवा प्राण वायू
रक्ताभिसरण सहज करितसे लाल तांबडा व्यान वायू
विनय नम्रता सौजन्यादि भाव वाहता अंतरातले
मस्तिष्काला शांत ठेवतो धवल निर्मल उदान वायू
दृष्टी वाचा तनमन बुद्धी इंद्रियांसह तोल साधण्या
देहामधल्या मळास ढकले कृष्ण श्यामल अपान वायू
उदरामधले अन्न पचविण्या लोहाराचा जणू भाता
अग्नी फुलवे नाभीमधला पीतवर्णी समान वायू
भूमीवरती जगता जगता कर्मनिर्जरा व्हावयाला
ऊर्ध्वगतीने लक्ष्य भेदण्या धनुष्यातला बाण वायू