मेरुस्तंभ मम जिनालयाचा भक्कम पाठीशी
कार्य कराया आत्महितास्तव कायम पाठीशी
सिद्धासन धनुरासन माझे जिनमूर्ती पुढती
नित्य पहाटे आसनमुद्रा उद्यम पाठीशी
शब्द अक्षरे नित्य परजुनी धार तयां लावते
स्वमन जिंकण्या दशधर्मातिल संयम पाठीशी
जीव जगाया जीवनदायी रस पाजे भूमी
सृष्टी जपण्या पंचभुतांचा आलम पाठीशी
घाम रक्त सांडून निर्जरा सुनेत्रास करण्या
पुण्याईच्या संचितातली रक्कम पाठीशी