लेखणीने, मार रट्टा, कागदांवर, कैक कोऱ्या, जागुनी तू..
घाल बेड्या, रंगलेले, हात धरुनी, पकड चोऱ्या, जागुनी तू…
फक्त इनपुट, द्यायचे अन, घ्यायचे आऊटपुटही, लक्षपूर्वक..
पाठ कर सर्कीट त्यांचा, वाजवीण्या, मस्त बोऱ्या, जागुनी तू…
ताडपत्रीने छतावर, घाल आच्छादन टळाया, नित्य गळती..
काळजी घे, छप्परांची, आवळूनी, बांध दोऱ्या,जागुनी तू…
ना तुझे हॉटेल आहे, मालकीचे, पण तरीही, शिकुन सवरुन..
स्वावलंबी, व्हावयाला, कपबश्याही, विसळ पोऱ्या, जागुनी तू…
करत गप्पा, रचत गोष्टी, चांदण्यांच्या, सांग सुंदर, रंगवूनी..
पूर्ण ब्रह्मांडी जुळाया, मैत्र गाढे, गात लोऱ्या, जागुनी तू…
अंबरी नक्षत्रवेली, फोडण्या हंडी दह्याची, चांदराती..
तारकांना, निवड रजनी, न्यास रचण्या, श्यामगोऱ्या, जागुनी तू…
मारण्या रट्टा न भावे, पण तरी मारून रट्टे, भिजव पीठे..
उकळत्या तेलात तळण्या, गोल चकल्या, फिरव सोऱ्या, जागुनी तू…
आवडीने, वाचताना, गझल माझी, शेर केव्हा, मोजले रे..
मौक्तिकांसम, मम टपोऱ्या, अक्षरांना, चाळ हलके, जागुनी तू…
पाड बुंदी भरुन झारा बांध लाडू जमवुनी साऱ्या मुलींना..
द्यावया खाऊ मुलांना लाडवांनी भर कटोऱ्या जागुनी तू…
दूर जा विजनी सुनेत्रा, त्या तिथे शेवाळलेल्या, अन घसरड्या,..
उंच दगडी, शून्य मजली, वाडियातिल, घास मोऱ्या, जागुनी तू…
गझल अक्षरगणवृत्त, लगावली- गालगागा / पाच वेळा
एका ओळीतील मात्रा पस्तीस
कवयित्री – सुनेत्रा नकाते