पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक,
वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४
श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे,
वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे।
वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी,
हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे।
तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी,
बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।
कर्म बांधले जे जीवांनी कर्मनिर्जरा त्यांची करण्या,
वदतो आपण वाणीने जे त्याला पाठण पठण म्हणावे।
अन्न शिजविण्या पात्रांमध्ये चूल पेटण्या भुकेजल्यांची,
उन्हामधे जे पडून वाळे त्या काष्ठांना जळण म्हणावे।
कामे करुनी थकल्यावरती छायेखाली बसण्यासाठी,
धक्का देते सुखद मनाला त्याला मोहक वळण म्हणावे।
जीवांच्या कल्याणासाठी साधक जे जे विहार करिती,
टेकुन माथा त्या पदकमली त्यांना पावन चरण म्हणावे।
शारद सुंदर पुनवेला जे अंबरातुनी नाचत येती,
स्पर्शुन जाती हृदय कळ्यांना त्यांना कोमल किरण म्हणावे।
जीवन अपुले अन दुसऱ्यांचे तृप्त करोनी तृप्त होउनी,
आनंदाने जन्म बदलते त्याला सुंदर मरण म्हणावे।