फुलाप्रमाणे कोमल सुरभित वज्रासम खंबीर स्वभाव
मुक्तिपथावरच्या आत्म्यांचा शूर वीर अन धीर स्वभाव
धर्म अहिंसा शाश्वत जगती बिंबविण्या आचरणातून
मन वचने कायेतुन झळके शुद्ध अहिंसक मीर स्वभाव
पुण्याईने मनासारखे घडते जेव्हा सारे छान
जणु काचेच्या पात्रामधले मधुर सुवासिक क्षीर स्वभाव
यौवन धन सत्तेची मदिरा चढते जेव्हा मस्तिष्कात
उतरविण्या ती मादक धुंदी होतो वेडा पीर स्वभाव
आठ रसांना पूर्ण प्राशुनी मन आसुसता शांत रसास
ध्यानामध्ये उतरत जातो शीतल निश्चल नीर स्वभाव
गझल मात्रावृत्त – मात्रा ३१